|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भिकवडी(बु.) येथे 110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले

भिकवडी(बु.) येथे 110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले 

प्रतिनिधी/ विटा

नातेवाईकांच्या विवाहासाठी गावी आलेल्या मुंबईस्थीत विवाहितेचे 110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने आणि 13 हजारांची रोकड चोरटय़ांनी लंपास केली. चोरटय़ांनी एकुण 1 लाख 23 हजारांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लांबवला असल्याचे तामखडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. ही घटना खानापूर तालुक्यातील भिकवडी(बु.) येथे मंगळवार 9 मे रोजी घडली. याबाबत अर्चना आप्पा तामखडे(रा. गोरेगांव, मुंबई) यांनी वर्दी दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मुळच्या भिकवडी(बु.) येथील अर्चना आप्पा तामखडे या मुंबईत वास्तव्यास असतात. नातेवाईकांच्या विवाहासाठी म्हणून 8 मे रोजी त्या गावी भिकवडी(बु.) येथे आल्या होत्या. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि 13 हजार रूपयांची रोकड तामखडे यांनी गुलाबी रंगाच्या पिशवीत ठेवली होती. ही पिशवी घरात ठेवून कुलूप लावून त्या दीर भिमराव तामखडे यांच्या घरी गेल्या होत्या. बुधवारी 10 मे रोजी सकाळी घराचे कुलूप उघडण्यासाठी पाहिले असता कुलूप उचकटले असल्याचे तामखडे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घरात पाहिले असता पिशवीतील सोन्याचे दागिने असणारी प्लास्टीकची पिशवी गायब होती. पर्समधील रोकड गायब होती आणि पुढील खोलीतील लाकडी कपाटाचे ड्रॉव्हर उघडे होते, असे अर्चना तामखडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर अर्चना तामखडे यांनी नातेवाईकांना बोलावून चोरीची माहिती दिली. या चोरीत तामखडे यांच्याकडील 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन, 10 ग्रॅम वजनाचा लक्ष्मी हार, 10 ग्रॅम वजनाचा आणखी एक हार, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची एक पदरी बारीक मण्याची माळ, 10 ग्रॅम वजनाचे फुले आणि झुमके, 10 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठय़ा, 10 ग्रॅम वजनाची वेलपट्टीची अंगठी, 5 ग्रॅम वजनाची सोनसाखळी, 5 ग्रॅम वजनाचे झुमके असे सुमारे 110 ग्रॅम वजनाचे जुन्या वापरातील किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 13 हजारांची रोकड असा एकुण 1 लाख 23 हजारांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लांबवला असल्याचे तामखडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ए. टी. सुनगार करीत आहेत.