|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » आधार-पॅन जोडणी सहजसोपी

आधार-पॅन जोडणी सहजसोपी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था:

प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डबरोबर आधारला जोडण्याची नवीन सुविधा सुरू केली. प्राप्तिकर रिटर्न दाखल करताना पॅन आणि आधार जोडणी असणे आवश्यक आहे. विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटच्या होमपेजवर https://incometaxindiaefiling.gov.in सुरू केली आहे. या ठिकाणी जात वैयक्तिक पॅनकार्डधारकांना दोन्ही कार्डचे क्रमांक आणि वापरकर्त्याचे नाव द्यावे लागेल. प्राप्तिकर विभागाने करदाते आणि वैयक्तिक वापरकर्त्यांना दोघांसाठीही माहिती प्रसिद्ध केली आहे.

पहिल्यांदा ई-फायलिंगच्या वेबसाईटच्या होमपेजवर देण्यात आलेल्या या नवीन लिंकला ओपन करावे लागेल. हे पान उघडताच यामध्ये आधार क्रमांक आणि पॅन क्रमांकाबरोबर आपल्या नावाची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर युनिक आयडेन्टिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून या माहिती तपासण्यात येईल. दोन्ही माहिती जुळत असल्यास आधार आणि पॅनकार्ड लिंक झाल्याचे कन्फर्म सांगण्यात येईल.

जर आधार कार्डमध्ये देण्यात आलेल्या नावामध्ये कोणत्याही प्रकारची चूक असल्यास वन टाईम पासवर्ड आवश्यक असेल. हा ओटीपी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर पाठविण्यात येईल. लिंक करण्यासाठी पॅन आणि आधार कार्डवरील जन्मतारीख आणि लिंग एकसमान असणे आवश्यक असल्याचे विभागाने म्हटले. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ई-फायलिंग वेबसाईटवर लॉगिन अथवा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. या नवीन सुविधेने कोणताही व्यक्ती आधार कार्डला पॅनकार्डबरोबर लिंक करू शकतो.