|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मातीचे ढिगारे उचलण्यास आलेल्या जेसीबीकडून खडीचे नुकसान

मातीचे ढिगारे उचलण्यास आलेल्या जेसीबीकडून खडीचे नुकसान 

 प्रतिनिधी /बेळगाव :

महापालिकेच्यावतीने कडोलकर गल्लीतील रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येत आहे. येथील व्यापाऱयांनी मालमत्ता हटवून घेण्यास प्रारंभ केला आहे. तसेच इमारतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. याकरिता बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. मात्र नागरिकांना पुर्व सुचना न देता बुधवारी रात्री येथील मातीचे ढिगारे हटविण्याचे काम हाती घेवून याठिकाणी ठेवण्यात आलेली खडी रस्त्यावर पसरवली असल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

मालमत्ताधारकांना नोटीस न देता रस्ता रूंदीकरणास प्रारंभ करण्यात आले आहे. रस्ता रूंदीकरणास सहकार्य करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला आहे. मात्र महापालिकेकडून सहकार्य होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. मालमत्ता हटविण्याची सुचना केल्यानंतर मालमत्ताधारकांनी मालमत्ता हटवून घेण्यास प्रारंभ केला आहे. मात्र महापालिकेच्या मालकीच्या इमारतीचा भाग महापालिकेच्यावतीने हटविण्यात आला. काही मालमत्ताधारकांनी रस्त्यात येणारा भाग हटवून दुरूस्तीचे काम हाती घेतले. याकरिता रस्त्यावर खडी, वाळू आणि इतर साहित्य ठेवले होत. पण येथील रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटविताना महापालिकेच्या जेसीबीने ठेवण्यात आलेली वाळू आणि खडी पसरविण्यात आली असल्याचा प्रकार बुधवारी रात्री करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी चौकशी केली असता, महापालिकेच्या जेसीबीने करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे महापालिकेकडूनच बांधकाम साहित्याचे नुकसान करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रस्ता करण्यासाठी सहकार्य करताना जागा गमवावी लागली, तसेचे इमारतीचे नुकसान झाले आहे. अशातच आता महापालिकेकडून बांधकाम साहित्याचे नुकसान करण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. यामुळे याची चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी होत आहे.

Related posts: