|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सिद्धेश्वर कारखान्याला आग

सिद्धेश्वर कारखान्याला आग 

सोलापूर / वार्ताहर :

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याला लागलेल्या आगीत सुमारे 35 ते 40 लाख रूपायाचे नुकसान झाले. महापालिकेच्या आग्निशामक दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्पर्यतेमुळे कारखान्याचे मोठे नुकसान टळले. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत कारखान्याला लागलेल्या आगीची ही दुसरी घटना आहे.

होटगी रोडवर असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखारखान्याच्या को. जनरेशन प्रकल्पामध्ये सुमारे 100 फुट उंचवर गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कनेक्टीव्ह बेल्टवर वेल्डींगचे काम सुरू होते. कामगार वेल्डींग करीत असताना त्यातून खाली आगीच्या ठिणग्या पडत होत्या. काम सुरू असलेल्या बेल्टच्या खाली वाळलेले गवत आणि को. जनरेशन प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे बगॅस मोठय़ा प्रमाणात होते. पडलेल्या या ठिणग्यामुळे वाळलेल्या गवताने आणि बगॅसने पेट घेतला. उपस्थित असलेल्या कामगारांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण, आगीने बघता बघता रूद्ररूप धारण केले.

आग आटोक्याच्या बाहेर जात असल्याची बाब उपस्थित कामगारांच्या लक्षात येताच 11 वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या व्यवस्थापनाने याची माहिती महापालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. यानंतर अग्निशामक दलाने होटगी रोडरवरील दोन गाडय़ा तातडीने घटनास्थळी रवाना केल्या. पण, या दोन गाडय़ांना ही आग आटोक्यात न आल्याने एकून आठ गाडय़ांचा वापर करीत 20 कर्मचाऱयांनी सुमारे दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली.

या आगीत कारखान्याचे सुमारे 35 ते 40 लाख रूपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. यामध्ये बगॅस, कनेक्टींव बेल्टवरील साहित्य, मोटारी, इलेक्ट्रीक वायरिंग यासह अन्य महागडे साहित्य आगीच्या बक्षस्थानी पडले आहे. कारखान्याच्या मुख्यगेटपासून काही फुटाच्या अंतरावरच या प्रकल्पासाठी लागणारे बगॅस आणि वारींग ठेवण्यात आले होते. त्यामुळे या आगीने काही मिनिटातच आपले उग्ररूप धारण केले. पण, अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे आग आटोक्यात आणली. हीच आग गेटपर्यत पोहचली असती आणि बगॅसने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडून नुकसानही मोठे झाले असते.