|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत इव्हाना फुर्तादोला सुवर्ण

आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत इव्हाना फुर्तादोला सुवर्ण 

क्रीडा प्रतिनिधी /फोंडा :

शिराज-इराण येथे बुधवारी आशियाई कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याची वुमन इंटरनॅशनल मास्टर इव्हाना फुर्तादो हिने मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत अपराजित राहून 9 फेऱयामधून तिने 7 गुण प्राप्त केले. या स्पर्धेत तिला दुसरे मानांकन प्राप्त झाले असून 5 सामन्यांत तिने विजय मिळविला, तर 4 सामन्यांत बरोबरी साधून ही सुवर्णमय कामगिरी केली आहे.

 यापुर्वी 2013 मध्ये तिने या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. याशिवाय तिने रौप्य व कास्य पदकही पटकावले होते.

इव्हानाने सातव्या फेरीत इराणच्या डब्ल्यूएफएम अलिना साब मोबिनो (2226), तर टीजीकेच्या ओतोंबी मुत्रिबा, सिरियाच्या मनार खलीलने यांच्यावर विजय मिळविला. भारताच्या मेघना सी. एच., बिधार ऋतुंबरा, हर्षिता दुडांटी व इराणच्या अली झांजाडे, मोहादेश यांच्याविरुद्धचे सामने बरोबरीत सोडवले. भारताची मेघना व ऋतुंबरा बिधार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. या स्पर्धेच्या कामगिरीवरुन इव्हानाला वुमन ग्रेंण्डमास्टरचा नॉर्म मिळणार आहे. यापूर्वी तिने एक नॉर्म प्राप्त केला आहे.

इव्हाना फुर्तादो ही दोनापावल येथील अवर लेडी ऑफ रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी तिचे अभिनंदन करुन गोव्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याचे सांगितले. तसेच सचिव किशोर बांदेकर, खजिनदार रामदास सावंत व इतर पदाधिकाऱयांनी तिचे अभिनंदन केले आहे. आज 12 रोजी इव्हानाचे दुपारी 1.30 वा. दाबोळी विमान तळावर आगमन होणार आहे.