|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कर्नाटकाने पैसे देऊन साक्षीदार म्हणून उभे केले

कर्नाटकाने पैसे देऊन साक्षीदार म्हणून उभे केले 

प्रतिनिधी/ पणजी

कर्नाटकाने आपल्याला पैसे देऊन साक्षीदार म्हणून न्यायालयात उभे केले आहे, याची कबुली कर्नाटकाचे तज्ञ साक्षीदार गोसाईन यांनी मान्य केले आहे. त्यांची उलटत पासणी बरीचवेळ चालली होती. दरवर्षी पावसाचे प्रमाण बदलू शकते, असेही त्यांनी म्हादई जलतंटा लवादाला सांगितले.

कर्नाटकाचे साक्षीदार हे तज्ञ साक्षीदार असून प्रा. गोसाईन हे दिल्ली आय. आय. टी. चे प्राध्यापक आहेत. त्यांनी कर्नाटकाच्या बाजूने साक्ष देण्याचे व अहवाल तयार करण्याचे काम 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात मान्य केले होते. त्याप्रमाणे आपण अहवाल तयार केला, असे प्रा. गोसाईन यांनीच लवादाला सांगितले.

कर्नाटकला हवी तशी आकडेशवारी

गोव्याचे ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी हरकत घेताना तज्ञ साक्षीदार हे पैसे देऊन आणलेले साक्षीदार असू शकत नाहीत. त्यांनी मोबदला घेतला म्हणजे ते कर्नाटकाला हवा तसा अहवाल तयार करतील हे निश्चित आहे. त्यामुळे म्हादई परिसरात किती पाऊस पडतो व त्या नदीत किती पाणी आहे, याचा अभ्यास करून त्यांनी सादर केलेली आकडेवारी ही सध्यस्थितीला धरून नाही. कर्नाटकाला जशी आकडेवारी हवी तशी त्यांनी तयार करून दिली आहे. या आकडेवारीवर विसंबून राहता येत नाही असा दावा ऍड. नाडकर्णी यांनी केला.

आपली आकडेवारी शाश्वत नाही

आपल्याला कर्नाटकाने पैसे दिल्याचे त्यांनी उलटतपासणीच्या वेळी मान्य केले. तसेच आपल्या अहवालातील आकडेवारी बदलू शकते, कारण दरवर्षी पावसाचे प्रमाण बदलू शकते.  त्यामुळे आपली आकडेवारी शाश्वत म्हणता येत नाही असेही त्यांनी मान्य केले.

गेग स्टेशनबाबत उत्तर नाही

15 नोव्हेंबर 2016 रोजी प्रा. गोसाईन यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात चापोली व गवळी गेग स्टेशनाचा उल्लेख होता. पण आपल्या अहवालात या दोन्ही गेग स्टेशनाचा उल्लेख का नाही, याचे उत्तर प्रा गोसाईन देऊ शकले नाहीत.

सीडब्लूसी अहवालात ज्या गेग स्टेशनचा उल्लेख आहे, त्याच स्टेशनाचा उल्लेख गोसाईन यांनी आपल्या अहवालात केला आहे. शब्दाला शब्द नक्कल करून त्यांनी हा अहवाल तयार केल्याचा दावा ऍड. नाडकर्णी यांनी केला.

लवादाने उलटतपासणी आवरती घेण्याचा सल्ला देऊनही गोव्याच्या वतीने उलटत पासणी संपलेली नाही. आज मंगळवार 16 मे रोजीही ती पुढे चालू राहाणार आहे.