|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » मोदी सरकारच्या वर्षपूर्तीने बाजारात तेजी

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीने बाजारात तेजी 

वृत्तसंस्था/ मुंबई

जोरदार खरेदी झाल्याने भांडवली बाजाराचे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरून चांगले संकेत आणि मोदी सरकारला लवकरच तीन वर्षे पूर्ण होणार असल्याने तेजी आली होती. निफ्टी पहिल्यांदाच 9,500 च्यावर पोहोचत बंद झाला. सेन्सेक्सनेही विक्रमी 30,600 पर्यंत मजल गाठली. सेन्सेक्स 0.75 टक्के आणि निफ्टी 0.7 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 260 अंशाने मजबूत होत 30,583 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 67 अंशाच्या तेजीने 9,512 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही तेजी आली होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 टक्क्यांच्या मजबूतीने बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारला.

आयटी, एफएमसीजी, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू आणि स्थावर मालमत्ता समभागात खरेदी झाल्याने बाजारात तेजी आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1.2 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1 टक्के आणि वाहन निर्देशांक 1.1 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.7 टक्के आणि स्थावर मालमत्ता निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत झाला. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत 22,928 वर बंद झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

हीरो मोटो, एसीसी, भारती एअरटेल, टीसीएस, बँक ऑफ बडोदा, आयटीसी आणि एसबीआय 3-2.2 टक्क्यांनी वधारत बंद झाले. कोटक महिंद्रा बँक, हिंडाल्को, इंडियाबुल्स हाऊसिंग, ओएनजीसी, महिंद्रा ऍन्ड महिंद्रा, कोल इंडिया, भेल आणि सिप्ला 1.4-0.3 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात अदानी पॉवर, 3एम इंडिया, इंडियन हॉटेल्स, युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया 8.6-3.5 टक्क्यांनी मजबूत झाले. युनायटेड ब्रेव्हरेजीस, पिरामल एन्टरप्रायजेस, पेज इन्डस्ट्रीज, एमआरपीएल आणि कोलगेट 2.2-1.8 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात सुराणा सोलार, अवंती फीड्स, ग्रॅव्हिटा इंडिया, ओरिएन्टल बेल आणि जीनस पॉवर 18.9-10 टक्क्यांनी वधारले.