सुभाष जाधव यांचा तलावात बुडून मृत्यू

सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी नगरसेवक विलास जाधव यांचे बंधू सुभाष मुकुंद जाधव (55) यांचा मृतदेह मंगळवारी मोती तलावात तरंगताना आढळून आला. काठावर बसले असता तोल जाऊन तलावात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत यांनी दिली.
येथील गरड भागातील रहिवासी सुभाष जाधव हे 14 मेच्या रात्रीपासून घरात आले नव्हते. त्यांची पत्नी व मुलगा शाळेला सुट्टी असल्याने वेंगुर्ले येथे गेले होते. त्यामुळे सुभाष घरी आले की नाही, हे कोणालाच माहीत नव्हते. सोमवारी सकाळी मोती तलावात न्यायालयाच्या बाजूने काठावर एक चप्पल आढळून आले, तर राजवाडय़ासमोर प्लेजर दुचाकी दिसून आली. सदरची दुचाकी सुभाष जाधव यांची असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत, पोलीस हवालदार डुमिंग डिसोजा, हरी सावंत, मंगेश शिंगाडे, नितीन हुमरसकर यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत होता. घटनास्थळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, शब्बीर मणियार, राजू मसुरकर आदींसह नागरिक उपस्थित होते. येथील कुटिर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालात नमूद आहे, अशी माहिती पोलीस हवालदार डुमिंग डिसोजा यांनी दिली. सायंकाळी येथील उपरल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभाष जाधव यांचा गेल्या कित्येक वर्षांपासून कपडय़ांचा व्यवसाय होता. गेले काही महिने त्यांनी व्यवसाय बंद ठेवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.
तलावाच्या काठाला रिलिंग बसवा!
गेल्या दोन/तीन महिन्यांत मोती तलावाच्या काठावर बसणाऱयांपैकी अनेकांचा तोल जाऊन बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेकडे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तलावाकाठी लोखंडी रिलिंग बसविण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी केला. आता तरी नगरपालिकेने त्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.