|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बाबा, घर विका, पण मला बरं करा !

बाबा, घर विका, पण मला बरं करा ! 

एका मुलीच्या आर्त विनवणीकडे पित्याची पाठ   मृत्यूनंतर चित्रफित व्हायरल

वृत्तसंस्था/ विजयवाडा

कर्करोगाशी झुंजत असलेली एक मुलगी आपल्या उपचारासाठी पित्याकडे विनवणी करत राहिली. घर विका आणि माझ्यावर उपचार करा असे ती पुन्हापुन्हा आपल्या पित्याला सांगत राहिली. परंतु तिच्या निष्ठूर वडिलांनी आपले कर्तव्य पार न पाडल्याने ती कर्करोगासोबत जीवनासाठीच्या युद्धात पराभूत झाली. तिच्या मृत्यूनंतर तिने वडिलांना पाठविलेला चित्रफित रुपातील संदेश व्हायरल झाला आहे. हे प्रकरण आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील आहे. दुर्देवी मुलीचे नाव साईश्री (वय 13 वर्षे) असून तिला बोन मॅरो कॅन्सर झाला होता. तिच्या आईने तिच्यावर उपचारासाठी 40 लाख रुपये खर्च केले होते.

शिवकुमार यांनी पत्नी सुमाश्री आणि मुलगी साईश्रीला 8 वर्षांपूर्वीच सोडले होते. विभक्त होण्यापूर्वी दांपत्याने आपल्या मुलीच्या नावे दुर्गापुरममध्ये घर खरेदी केले होते. विभक्त झाल्यानंतर आई आणि मुलगी तेथेच राहत होते. काही काळानंतर साईश्रीला कर्करोग झाल्याचे निदान झाले, काही महिन्यांपूर्वी जेव्हा तिची प्रकृती खूपच बिघडली तेव्हा तिने उपचारासाठी आपल्या वडिलांना घर विका अशी विनंती केली.

सुमाश्री यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी 40 लाख रुपये खर्च केले होते आणि तिच्याजवळ आता आणखी रक्कम शिल्लक नव्हती. त्यामुळे साईश्रीने वडिलांना संदेश पाठवून रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली, परंतु तिच्या वडिलांनी कोणताही प्रतिसाद दर्शविला नाही.

वडिलांनी पाठविले होते गुंड

चित्रफित व्हायरल झाल्यानंतर नाराज होत शिवकुमार यांनी घर रिकामे करण्याची धमकी पत्नीला दिली होती. त्याचबरोबर त्याने तेलगू देसम पक्षाचे आमदार बोंदा उमामहेश्वर राव यांच्या मदतीने घर रिकामे करविण्यासाठी गुंड पाठविल्याचा दावा सुमाश्री यांनी केला आहे. शिवकुमार हा आमदाराचा समर्थक आहे. परंतु आमदाराने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

पोलिसांकडे तक्रार

याप्रकरणी गुंडांविरोधात तक्रार नोंद न करण्याचा आरोप पोलिसांवर झाला आहे. साईश्रीच्या आईला घर रिकामे करण्यासाठी फोनवरून धमकाविले जात होते, तिने याची तक्रार नोंद केल्याचा दावा विजयवाडाचे पोलीस अधीक्षक पालाराजू यांनी केला.

प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे

हे प्रकरण राज्याच्या मानवाधिकार आयोगाकडे पोहोचले आहे. आम्ही याप्रकरणी आयोगाकडे याचिका दाखल केली असून त्वरित कारवाईची मागणी केल्याचे स्वयंसेवी संस्था बलाला हक्कुला संगमच्या अध्यक्षा अच्युता राव यांनी सांगितले. आयोगाने याप्रकरणी पोलीस आयुक्तांना विस्तृत अहवाल देण्याचा निर्देश दिला आहे.

 

 शाळेत जाण्याची होती इच्छा

“मी शाळेत जाऊ इच्छिते आणि मित्रांसोबत खेळू इच्छिते’’ असे तिने आपल्या चित्रफित रुपातील संदेशात वडिलांना उद्देशून म्हटले होते. तसेच तिने आपल्या बिघडलेल्या प्रकृतीविषयी सांगता यावे यासाठी वडिलांना व्हिडिओ चॅट करण्यास सांगितले होते. साईश्रीने पैशांच्या व्यवस्थेसाठी घर विकू देण्याची अनुमती मागितली, परंतु तिच्या वडिलांना दयेचा पाझर फुटला नाही. 14 एप्रिल रोजी अखेर साईश्रीचे निधन झाले.

Related posts: