|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बळीराजाचा बळी घेणाऱया सरकारविरोधात संघर्ष तीव्र

बळीराजाचा बळी घेणाऱया सरकारविरोधात संघर्ष तीव्र 

कर्जमाफी,सातबारा कोरा होईपर्यंत संघर्ष सुरूच

प्रसंगी रस्त्यावर उतरणार- विखे-पाटील

सरकारकडून विश्वासघात व फसवणूक

प्रतिनिधी /रत्नागिरी

निवडणुकीपुर्वी दिलेल्या आश्वासनांचा भाजप-शिवसेना सरकारला विसर पडला असून शेतकऱयांचा विश्वासघात केला जात आहे. उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेशात कर्जमाफी मिळते पण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचा अजूनही अभ्यासच सुरू आहे. सरकारविरोधातील ‘संघर्ष यात्रा’ समाप्त होत असली तरी आमचा संघर्ष सुरूच राहील. जोपर्यंत शेतकऱयांचा सातबारा कोरा होत नाही, त्यांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही. सरकारविरोध्घत प्रसंगी रस्त्यावरही उतरू असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी व समविचारी विरोधी पक्षांची संघर्ष यात्रेचा अखेरच्या टप्प्यातील झंझावात कोकणात सुरू आहे. ही संघर्ष यात्रा गुरूवारी रत्नागिरी दाखल झाली. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित नेतेमंडळी, आमदारांनी भाजपा-शिवसेना युती सरकारविरोधात जोरदार आगपाखड केली.

शेतकऱयांचा अंत न पाहता तात्काळ कर्जमाफी दय़ा

शासनाबाबत जनतेत प्रक्षोभ आहे. फक्त घोषणे पलिकडे या सरकारने काहीही केले नाही. गेल्या अडीच वर्षात राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. 10 हजार पेक्षा जास्त आत्महत्त्या या शासनाच्या काळात घडल्या आहेत. कोकणातील आंबा व इतर फळबागायतींची अवस्था बिकट आहे. आता शेतकऱयांचा अंत न पाहता ताबडतोब कर्जमाफी मिळावी अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखेपाटील यांनी केली.

शेतकरी, मच्छिमारही उध्वस्त-तटकरे

युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्यातील शेतकऱयांबरोबरच कोकणातील शेतकरीही उध्वस्त झाला आहे. येथील भात खरेदी बंद झाली. काजू, आंबा याप्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाची स्थितीबाबत विचारायलाच नको. केंद्रीय अवजडउद्योगमंत्री अनंत गीते महामार्गावर टोल आकारणीच्या वल्गना करत आहेत. सागरी महामार्गाकडे दुर्लक्ष झालेले आहे. मत्स्य उद्योगात स्थानिक मच्छिमार भरडला गेला आहे. शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची लढाई सुरूच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.

सरकारकडून शेतकऱयांची चेष्टा-पृथ्वीराज चव्हाण

शेतकऱयांना कर्जमाफी झालीच पाहिजे. 50 टक्के नफा व शेतीला हमीभाव अशा घोषणा युतीच्या सरकारने निवडणूकीपूर्वी दिल्या होत्या. पण त्याच्या पूर्तीसाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाही. उत्तरप्रदेशात तेथील सरकारकडून कर्जमाफी मिळते पण महाराष्ट्रात शेतकरी प्रतिक्षेत आहे. महाराष्ट्रात सरकार गंभीर नसून शेतकऱयांची चेष्टा चालली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आश्वासने देतात पण त्याचा त्यांना विसर पडलेला आहे. तुरडाळीचा प्रश्न गंभीर असून 400 कोटीचा घोटाळा झाल्याचे जाहीर झाले आहे. पण त्याची चौकशी कोण करणार? त्यामुळे घोटाळे करणारे अधिकारी किंवा मंत्र्यावर कडक कारवाई करावी अशी परखड भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे.

पंचाग बघून कर्जमाफी करणार का?- अजित पवार

आतापर्यत अनेक सरकार येऊन गेली पण भाजप-शिवसेना यांच्या दुटप्पी सरकार कधी पाहिले नाही. शेतकऱयांच्या आत्महत्त्या वाढल्या आहेत. पण कोकणातील शेतकऱयांच्या कणखर मानसिकतेचा बोध राज्यातील इतर शेतकऱयांनीही घ्यायला हवा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तीन वर्ष उलटत आली तरी राज्यकर्त्यांनी अजून कोणताही निर्णय अंमलात आणला नाही. आम्ही देखील राज्य चालवले पण आताचे सरकार कर्जमाफीसाठी योग्यवेळ बघण्यासाठी पंचाग बघून मुहूर्त काढणार का? असा सवाल पवार यांनी केला आहे.

बळीराजाचा बळी घेणारे निर्लज्ज सरकार-प्रा.कवाडे

विद्यमान राज्य सरकार निर्लज्ज आहे. शिवबा, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या या महाराष्ट्रात शेतकऱयाला आत्महत्त्या होणे याविषयी प्रा.कवाडे यांनी खंत व्यक्त केली. बळीराजाचा बळी घेणारे हे युतीचे सरकार आहे. शेतकरी सुखाने जगला पाहिजे हे संघर्ष यात्रेचे ध्येय आहे. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणारे हे सरकार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भूमिका शेतकऱयांच्या आत्महत्त्येस कारणीभूत असून अजूनही ते शेतकऱयांची कर्जमाफी करू शकलेले नाहीत. विश्वासघाती सरकारकडून शेतकऱयांची नुसती फसवणूक सुरू असल्याचे प्रा. कवाडे यांनी परखड टिका केली आहे.

भाजपाने ‘शिवार संवाद’ नको ‘शिवराळ यात्रा’ काढावी

आम्ही संघर्ष यात्रेची घोषणा करताच भाजपाने ‘शिवार संवाद’ हाती घेतले. संवाद ऐवजी भाजपावाले शेतकऱयांना शिवराळ भाषेत सुनावू लागले. त्यांनी आता ‘शिवराळ यात्रा’ काढावी. शिवसेनेने ‘संपर्क यात्रा’ सुरू केली. पण शिवसेनेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. मंत्रींमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसायचे, काजू-बदाम खायचे आणि बहहेर येऊन सांगायचे आम्हाला निर्णय समजला नाही असे या सरकारचे दुटप्पी धोरण सुरू असल्याची खोचक टिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखेपाटील यांनी केली आहे.

Related posts: