|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » राहुल देव प्रथमच मराठी चित्रपटात

राहुल देव प्रथमच मराठी चित्रपटात 

प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने निर्माता-दिग्दर्शकांची नवी फळी मराठी चित्रपटात नवनवे बदल करू पाहतेय. तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा कथा विषय, संगीत असलेले चित्रपट अलीकडच्या काळात कौतुकास पात्र ठरलेत हेच लक्षात घेऊन सेव्हन सीज् व ड्रीम विव्हर प्रोडक्शन्सने ‘रॉकी’ हा ऍक्शनपॅक्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक व नफत्यदिग्दर्शक अहमद खान यांच्या हस्ते संपन्न झाला. हा चित्रपट रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करेल असा विश्वास व्यक्त करताना अहमद खान यांनी चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

रोमान्स, पॅमिली ड्रामा आणि ऍक्शन याचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या ‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील अभिनेते राहुल देवही या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत. 

या चित्रपटाचे निर्माते मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर असून दिग्दर्शन अदनान शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख व विहार घाग यांनी केले असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान करणार आहेत. समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत चित्रपटातील गीतांना लाभणार आहे.