|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » फेसबुकची पाने भरतात; पण जीवाभावाचा मित्र नाही

फेसबुकची पाने भरतात; पण जीवाभावाचा मित्र नाही 

प्रख्यात लेखक डॉ. अनिल अवचट यांची खंत

रत्नागिरी / प्रतिनिधी

मानवी जीवन भाव भावनांचे आहे. आता अनेक लोक दिवसभर इंटरनेटचा वापर करतात. त्यांचे तेच जीवन झाले आहे. फेसबुकची पानेच्या पाने लिहिली जातात, परंतु जीवाभावाचे मित्र नाहीत, अशी खंत आज समाजासमोर आहे. माणूस शिकतो; पण चांगुलपणा त्याच्याकडे असेल असे नाही, असे मत प्रसिद्ध लेखक आणि डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात जनसेवा ग्रंथालयातर्फे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी घेतली. कऱहाडे ब्राह्मण संघाने या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन दिली असून रत्नागिरीकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

डॉ. अवचट म्हणाले, शिक्षणाची वाट चुकल्यासारखे वाटते आहे. स्वतंत्रपणे प्रश्न विचारण्याची विद्यार्थ्यांची वृत्ती वाढवली पाहिजे. कुतहुल शमवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ते पुढे आले पाहिजेत, परंतु तसे दिसत नाही. माणूस माणसाशी संवाद साधताना दिसत नाही. डॉक्टरांनी पेशंटशी बोलायला पाहिजे. परंतु तसे बोलणे होताना दिसत नाही. पत्नी, मुले आदींना विसरुन आजची पीढी सतत संगणकाच्या विश्वात रमलेली असते. घरातल्या विविध कामांमध्ये देखील आनंद मिळत असतो. अगदी शौचालय, बाथरुम साफ करण्यात सुद्धा आनंद असतो. असे विविध आनंद घेतल्याशिवाय माणसाच्या जीवनात समाधान मिळणार नाही. दुसरीकडे गतिमंद मुलांच्या स्पर्धेत घसरुन पडलेल्या सहकाऱयाला उचलण्यासाठी अन्य स्पर्धक पुढे येतात, ही पहिल्या क्रमांकासाठी जीवघेणी स्पर्धा करणाऱया लोकांच्या प्रवृत्तीवर  थप्पड असल्याचे डॉ. अवचट यांनी यावेळी नमूद केले.

मानवाचे निसर्गाशी सहजीवन आहे का?

पुस्तक लिहिण्यामागे कुतुहल शमवणे हीच प्रेरणा आहे. पशु, पक्षी, कीडे, मुंग्या यासारख्या निसर्गातील बाबींचे निरीक्षण करणे आणि रक्त, स्वादुपिंड, मधुमेह, मेंदु यासारख्या विविध अवयवांची कार्यपद्धती व रचना जाणून ती लेखबद्ध करणे अशा स्वरुपाचे काम आपण केले आहे. जंगलातील खाणी फक्त माणसासाठी, असा मानवकेंद्री विचार होत आहे. निसर्गातील प्रत्येकासाठी असा विचार होत नाही. जो जे वांछिल तो ते लाहो… असा विचार नाही. आज साप आहेत म्हणून उंदरांवर नियंत्रण आहे. अन्यथा उंदीर प्रचंड माजले असते. निसर्गात अन्य जीव सहकार्याने राहतात, परंतु मानवाचे निसर्गाशी सहजीवन आहे का, असा प्रश्न पडत असल्याची खंत डॉ. अवचट यांनी मांडली.