|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला निलंगा येथे अपघात

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला निलंगा येथे अपघात 

प्रतिनिधी/ लातूर

लातूर जिल्हय़ातील निलंग्याहून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर विद्युत तारेला अडकून पडल्याचे सांगण्यात येते. फडणवीस यांच्यासोबत मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, प्रसिद्ध सल्लागार केतन पाठक व खाजगी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे हेलिकॉप्टरमध्ये असलेले चारही जण सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाली. मुख्यमंत्र्यांनी मी व माझी संपूर्ण टीम सुरक्षित असल्याची व्टीटरव्दारे माहिती दिली. या मोठय़ा अपघातातून सुदैवाने मुख्यमंत्री व त्यांचे पीए थोडक्यात बचावले.

सकाळी 11.58 वाजता मुख्यमंत्र्यांनी निलंगा येथील हेलिपॅडवरुन मुंबईकडे जाण्यासाठी उड्डाण घेताच परिसर धुळीने व्यापला. यातच 40 फुटाच्या अंतरावर विद्युत तार व विद्युत डेपो होता. हेलिकॉप्टरचा पंखा तारेला अडकल्याने हेलिकॉप्टर खाली कोसळले. या झालेल्या अपघातात सर्वजण सुखरुप आहेत परंतु केतन पाठक यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात येते. हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर परिसरात सर्वत्र धुळ उडाली होती. काही क्षणात हेलिकॉप्टर कोसळल्याने प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱयात तसेच कार्यकर्त्यांत या घटनेची भीती निर्माण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व अन्य सहकाऱयांना हेलिकॉप्टरमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

या घटनेत हेलिकॉप्टरचे नुकसान झाले आहे. परंतु या अपघातात सुदैवाने कुणालाही मोठी इजा झाली नाही. अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना 11 कोटी 20 लाख नागरिकांच्या आशीर्वादाने तसेच आई तुळजाभवानीच्या कृपेने अपघातातून बचावल्याचे सांगून कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर त्यांनी बायरोड लातूर विमान तळावरुन मुंबई रवाना झाल्याची माहिती सांगण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अपघाताची बातमी मात्र सोशल मिडीया व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सर्वत्र समजल्याने मुख्यमंत्र्यांच्या या घटनेविषयी राज्यभरातून अनेकांनी चौकशी केल्याचे समजते.

मुख्यमंत्री हे ज्या हेलीकॉप्टरमधून निलंगा येथून मुंबईला जात होते ते हेलीकॉप्टर पवनहंस या कंपनीचे आहे. ते सुस्थितीत असल्याचे सांगण्यात येते पण हेलीपॅड उड्डाणाच्या वेळी प्रचंड धुळ झाल्याने पायलटला काही अंतरावर विद्युत तार दिसली नाही. तिथपर्यंत हेलिकॉप्टर गेले. सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱयांनी हेलीपॅडवर धुळ उडणार नाही यासाठी योग्य खबरदारी घेतली असती तर अपघात टळला असता असेही चर्चिले जात आहे. अत्यंत महत्वाच्या व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या झालेला अपघात हा नेमका कशामुळे झाला याबाबत वरीष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे.

या अपघातच्यावेळी शेजारच्या घरावर विद्युत तारावर पडल्याने शेख शिराज अब्दुल रशीद, सौ. सुक्षा भारत कांबळे, भारत मारोती कांबळे, श्रावण प्रभू बोयणे हे किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणच्या घराचेही किरकोळ नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी उभा असलेल्या ट्रकचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

Related posts: