|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गोवळकोट धक्क्यावरील सहाही तोफा गडावरच विसावणार

गोवळकोट धक्क्यावरील सहाही तोफा गडावरच विसावणार 

प्रतिनिधी / चिपळूण

शहरातील गोवळकोट येथील धक्क्यावर जमिनीत गाडल्या गेलेल्या सहाही तोफा काढून त्या गोविंदगडावर तोफांसाठी बांधण्यात आलेल्या कट्टय़ावर क्लिपने बंदिस्त करण्याची परवानगी पुरातत्व विभागाने दिली आहे. यासाठी केल्या जाणाऱया खोदकामासाठी पोलीस संरक्षण देण्याच्या सुचनाही येथील पुरातत्वचे सहाय्यक संचालक बी. व्ही. कुलकर्णी यांनी तहसीलदारांना केल्या आहेत.

निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या गोवळकोट येथे गोविंदगड असून या गडाच्या उत्तरेला गोवळकोट धक्क्यावर अनेक वर्षांपासून सहा तोफा जमिनीत गाडलेल्या स्थितीत आहेत. या तोफांचा उपयोग बोटी बांधण्यासाठी केला जात आहे. मात्र येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्था, राजे प्रतिष्ठान या संस्थांनी या तोफा संरक्षित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गडकिल्ले संरक्षण समितीचे सदस्य सचिन जोशी व अन्य अधिकाऱयांनी काही दिवसांपूर्वीच या तोफांची पाहणी केली होती. त्यानंतर आठवडाभरापूर्वी या तोफा शास्त्रशुद्ध पद्धतीने जमिनीबाहेर काढण्यासाठी तयारी करून त्यासाठी तोफांच्या नजीक खड्डेही पाडण्यात आले. मात्र गोवळकोट ग्रामस्थांनी त्याला अक्षेप घेऊन संबंधित अधिकाऱयांना अटकाव केला. यासंदर्भात तहसीलदार जीवन देसाई यांच्या उपस्थितीत संस्था आणि ग्रामस्थांची बैठक होऊन त्यामध्ये सहापैकी तीन तोफा गडावर आणि तीन धक्क्यावर ठेवण्याचा तोडगा काढण्यात आला होता.

दरम्यान, या ऐतिहासिक सहा तोफांसंदर्भात तहसीलदार जीवन देसाई यांनी पुरातत्व विभागाला पत्र पाठवले होते. त्यानुसार पुरातत्व विभागाने तहसीलदारांना पत्र पाठवून त्यामध्ये ग्लोबल चिपळूण पर्यटन संस्थेसह अन्य दोन संस्थानी केलेल्या मागणीनुसार ज्या तोफा गडावर ठेवण्यास परनवागी दिलेली आहे त्या सर्व तोफा डॉ. जोशी यांच्या उपस्थितीत तोफांसाठी खास तयार करण्यात आलेल्या कट्टय़ावर क्लिपने बंदिस्त करण्यास परवानगी देण्यात येत आहे. या तीनही संस्थांनी आपल्या अर्जातच पुरातत्व विभागाला अटी व शर्ती मान्य असल्याची हमी दिली आहे.

तसेच तहसीलदारांनी धक्क्यावरील मोठय़ा तोफा गोवळकोट बंदरातच ठेवण्याबाबत स्थनिक नागरिक हमी घेणार असल्याचे पाठवलेल्या पत्रात नमूद केले असले तरी बंदरावरील स्थानिकांचा तसा अर्ज अथवा हमीपत्र या कार्यालयाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे कागदपत्रे प्राप्त केल्याखेरीज या मोठय़ा तोफा बाहेर काढण्यास परवानगी देणार नसल्याचेही या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, डॉ. जोशी व संबंधित संस्था आपला वेळ व पैसा खर्च करून हा ऐतिहासिक वारसा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असेही कळवले आहे.