|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » धावत्या रेल्वेवर दगड फेकल्यास जन्मठेप

धावत्या रेल्वेवर दगड फेकल्यास जन्मठेप 

मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेने प्रवास करणे आता अधिक धोकादायक होत चालले आहे. धावत्या रेल्वेवर दगड फेकण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे. रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱयाला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. यावर रेल्वे प्रशासनाने दगडफेक करणाऱया समाजकंटकांवर यापुढे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवले जातील असे सांगितले.

रेल्वेच्या परिसरात ट्रकला लागून अनेक झोपडपट्टय़ांची संख्या आहे. यामध्ये लोहमार्गालगतच्या झोपडय़ांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड भिरकावतात. दरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये धावत्या रेल्वेवर दगडफेकीचे अनेक प्रकार घडले आहेत. परिणामी प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले. दरम्यान, या वर्षात जानेवारी ते मे या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावर दगडफेकीचे 34 प्रकार घडले आहेत. दगड भिरकावणारा माथेफिरू किंवा समाजकंटक दोषी ठरल्यास रेल्वे नियमानुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा ती भोगल्यानंतर त्यात आणखी 10 वर्षांची वाढ करण्याची तरतूद कायद्यात असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.