|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » असुरक्षिततेचा फेरा घट्ट; असावा सुंदर ‘सुरक्षित’ बंगला..!

असुरक्षिततेचा फेरा घट्ट; असावा सुंदर ‘सुरक्षित’ बंगला..! 

प्रतिनिधी / कराड

लोकसंख्या वाढली…शहरांचा विस्तारही वाढला पण त्याच तुलनेत असुरक्षिततेचा फेरा घट्ट झाल्याने चोऱयांचे प्रमाणही वाढल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. बंद घरांवर नजर ठेवून अवघ्या दोन चार तासात पाच, सहा बंगले फोडून चोरटे पसार होण्याची मालिकाच सध्या सुरू आहे. लाखो, कोटय़वधींची मालमत्ता केवळ एका कुलपाच्या भरवशावर ठेवून बिनधास्त वावरणाऱयांची झोप उडवत चोरटे हात साफ करत आहेत.

मलकापूर, कराडसह हजारमाचीत एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडय़ा झाल्या. यापूर्वीही एकाचवेळी चार ते पाच घरे फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांच्या अवधीनंतर चोरटय़ांची टोळी पुन्हा डोके वर काढते. चोऱयांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सूचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने चोरटय़ांचे फावत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सध्या कराड, मलकापूर, विद्यानगरपासून सर्वच उपनगरांत फ्लॅट संस्कृती जोर धरू लागली आहे. अपार्टमेंटची संख्या वाढली असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने कसलीच उपाययोजना केली जात नसल्याने चोरटय़ांचा खुलेआम वावर सुरू आहे. अपार्टमेंटची उभारणी करताना मुळातच सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. चोरटय़ांनी गत सहा महिन्यात ज्या पद्धतीने फ्लॅट फोडले आहेत, त्याची पाहणी केली असता एकाच पद्धतीने चोरटय़ांनी डाव साधल्याचे समोर येते. कटावणीसारख्या हत्याराने एका दणक्यात कडीकोयंडा उपसला जातो. त्यानंतर चोरटे घरात प्रवेश करून ऐवज लंपास करतात. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी अपार्टमेंटमधील प्रत्येक फ्लॅटच्या कडीकोयंडय़ाची पाहणी केली असता अत्यंत कमी दर्जाच्या प्रतिचा दरवाजा आणि कडीकोयंडा वापरला जात असल्याचे समोर येते. फ्लॅटमधील अंतर्गत डिझाईन व सजावटीसाठी लाखोंचा खर्च केला जातो मात्र ज्या कुलूप, दरवाजावर सुरक्षितता अवलंबून आहे त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. चोऱया झाल्या की पोलिसांच्या माथ्यावर खापर फोडून बरेचजण रिकामे होतात. पोलिसांनी सुरक्षेत हलगर्जीपणा करू नये, हे वास्तव असले तरी घरमालक म्हणून नागरिकांचीही काही जबाबदारी आहे.

अनेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये शेजारी कोण रहात आहे, याचीही एकमेकांना कल्पना नसल्याचे समोर आले. चोरटे दिवसा बंद फ्लॅट, घरे यांच्यावर फिरून पाळत ठेवतात. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने आपला डाव साधतात. कॉलन्यांची संख्या वाढली. मात्र, सुरक्षिततेच्या नावे बोंब असल्याने चोऱयांची मालिका सुरू झाली आहे. संशयास्पदरित्या फिरताना एखादी व्यक्ती दिसली तरी कोणाचे लक्ष नसते. भाडेकरूंसाठी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचेही पालन होत नाही. यावर उपाययोजनांसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related posts: