|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोलीस ठाण्याची इमारत पूर्णत्वास

पोलीस ठाण्याची इमारत पूर्णत्वास 

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या नवीन अद्ययावत अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरू होते. यासाठी सुमारे तीन कोटीचा निधी खर्च झाला आहे. जिल्हय़ात नव्याने नियुक्त झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या कार्यकाळात आता नवीन इमारतीचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा निर्णय गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर अवलंबून आहे.

सध्या सावंतवाडी पोलीस ठाणे पोलीस वसाहतीतील संस्थानकालीन इमारतीत गेल्या बारा वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी हे पोलीस ठाणे शहराच्या चितारआळी येथील इमारतीत होते. मात्र, ही इमारत धोकादायक बनल्याने पोलीस वसाहतीत हलविण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत अपुऱया जागेअभावी कामकाज हाताळणे कठीण होत आहे. पोलीस ठाण्यात सध्या असलेला 80 ते 85 पोलीस कर्मचारी वर्ग तसेच पोलीस अधिकारी, कार्यालयीन कामकाज, मुद्देमालासाठी अपुरी जागा अशा अनेक सुविधांअभावी सध्याची जागा कमी पडत आहे. यासाठी गृहविभागाने तीन वर्षांपूर्वी याच वसाहतीत भव्य इमारत बांधकामासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करत बांधकामाला सुरुवात केली.

या नवीन इमारतीत प्रशस्त हॉल, कॉन्फरन्स हॉल, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱयांना स्वतंत्र केबिन, महिला अधिकाऱयांना केबिन, महिला व पुरुषांसाठी सुसज्ज अशा कोठडी, संगणक कक्ष, वायरलेस कक्ष, विश्रामगृह, कॅन्टिन, स्टोअर रुम, पोलीस ठाण्यात येणाऱया तक्रारदारांसाठी प्रशस्त हॉल व बैठक व्यवस्था, टॉयलेट व्यवस्था, पाणी आदी सर्व सुविधा या इमारतीत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरील जागेत प्रशस्त पार्किंग आहे. इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून रंगरंगोटीही करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

या इमारतीचे उद्घाटन लवकरच होईल, असे आश्वासन सावंतवाडी दौऱयावर आलेले कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी दिले होते. मात्र, आश्वासन देऊन बराच काळ उलटून गेला तरीही उद्घाटन झालेले नाही. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस कर्मचारी वसाहत, पोलीस यंत्रणेसाठी सुविधांसाठी निधी मंजूर करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, निधीअभावी कामे रखडली आहेत. गृहराज्यमंत्री व पालकमंत्री केसरकर तुमच्या जिल्हय़ाचे आहेत. त्यामुळे गृहविभागाला मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे, असे बुरडे यांनी त्यावेळी सांगितले होते.

आता नव्याने नियुक्त झालेले कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सोमवारी जिल्हा दौऱयावर येत आहेत. त्यांनी नवीन इमारतीची पाहणी करून उद्घाटनाला हिरवा कंदील दाखवावा. तसेच पोलीस वसाहतीतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सध्या पोलीस कुटुंब राहत असलेल्या वसाहतीला भेडसावणाऱया समस्यांबाबत लक्ष घालणे आवश्यक आहे.

नव्वद टक्के काम पूर्ण

या इमारतीचे 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या लाईट फिटिंग, नळकनेक्शन, नवीन फर्निचर, सुविधा अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर इमारतीचा ताबा बांधकाम विभागाकडून मिळणार आहे. मात्र, या कामासाठी किती महिन्याचा अवधी लागणार हे अद्याप सांगता येणार नाही, अशी माहिती पोलीस विभगाकडून देण्यात आली.