|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » किल्ले रायगडावर सोन्याचे सिंहासन

किल्ले रायगडावर सोन्याचे सिंहासन 

प्रतिनिधी / महाड

किल्ले रायगडावर 4 जून रोजी 32 मण सोन्याचे सिंहासन बसवण्याचा संकल्प संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्यावतीने केला जाणार आहे. सोन्याचे सिंहासन असावे की नसावे, या बद्दल शिवभक्तांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. सिंहासन गडावर कोणत्या ठिकाणी बसवण्यात येणार, सिंहासनाच्या सुरक्षितेची काय व्यवस्था आहे असे एक ना अनेक प्रश्न शिवभक्तांमध्ये निर्माण झाले आहेत. यामध्ये शासनाची भूमिका देखिल महत्वाची ठरणार आहे.

सोहळ्याचा संकल्प 4 जून रोजी सोडणार

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानीचे ठिकाण असलेल्या किल्ले रायगडावर 32 मण सोन्याचे सिंहासन असावे, अशी भूमिका शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी घेतली आहे. या सिंहासनाचा संकल्प शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 4 जून रोजी सोडणार आहेत. तारीख आणि तिथीचा राज्यभिषेक दिवस सलग 6 आणि 7 असा आल्याने या सिंहासनाच्या विषयाला वेगळे महत्व निर्माण झाले आहे.

किल्ले रायगड होतोय संवेदनशील

किल्ले रायगड हा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने गडावर कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्यास मनाई आहे. मात्र भावनिक विषय उत्पन्न करुन अनेक वादग्रस्त विषय किल्ले रायगडावर होत असतात. त्यामुळे गडावर अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. गडावरील महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यावरुन वाद निर्माण झाला होता त्याच बरोबर मेघडंबरीतील पुतळा बसवणे, संभाजी भिडे यांनी छत्रपती उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये होळीच्या माळा वरील शिवपुतळ्याला बसवलेले छत्र या व अश्या अनेक घटनामुळे किल्ले रायगड संवेदनाशिल होत आहे. त्यामुळे गडावर कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सिंहासन बसवण्यासाठी कोणाचीही परवानगी घेणार नाही

संभाजी भिडे गुरूजींच्या शिवप्रतिष्ठानने सोडलेला 32 मण सोन्याच्या सिंहासनाचा संकल्प वादग्रस्त होण्याची शक्यता शिवभक्तांमध्ये व्यक्त केली जात आहे, याचा सोशल मिडीयावर मोठय़ा प्रमाणामध्ये प्रसार होत असुन 32 मण सोन्याचे सिंहासन बसवण्यासाठी आम्ही कोणाचीही परवानगी घेणार नसल्याचे विधान संभाजी भिडे करत असल्याचे दिसून येत आहे.

शिवभक्तांनी बॅक खात्यात रोख जमा करण्याचे आवाहन

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता किल्ले रायगडावर 32 मण सोन्याच्या सिंहासनाचा संकल्प सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. 3 जून रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयांतुन लाखो धारकरी किल्ले रायगडावर येणार आहेत. त्या दिवशी रात्री 9 वाजता भिडे गुरुजींचे व्याख्यान होणार आहे, दुसऱया दिवशी म्हणजेच 4 जून रोजी हा संकल्प कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोन्याच्या सिंहासनाला 3 कोटी 84 लाख रुपये खर्च येणार आहे. यासाठी शिवभक्तासाठी बॅंकेचे खाते सुरु करण्यात येणार आहे, या खात्याचा नंबर जाहीर करण्यात येणार आहे. शिवभक्तांनी सोन्याचे रुपांत देणगी न देता रोख रक्कम बॅकेच्या खात्यामध्ये जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिहासनाच्या सुर†िक्षतेसाठी 500 शिवभक्त गडावर उपस्थित राहणार

सोन्याचे सिंहासन मेघडंबरीमध्ये बसवण्यात येणार आहे. त्यासाठी आम्हाला शासनाच्या परवानगीची गरज नाही. तसेच सिंहासनाच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्रातील 384 तालुक्यांतील 500 शिवभक्त या सिंहासनाच्या सुरक्षितेसाठी गडावर उपस्थित राहातील त्या मुळे सोन्याच्या सिंहासनाच्या सुरक्षितेची काळजी कोणाला करण्याची गरज नाही, असे नितीन चौगुले यांनी सांगितले.