|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लाखोंची वित्तहानी करून पावसाची उसंत

लाखोंची वित्तहानी करून पावसाची उसंत 

प्रतिनिधी / रत्नागिरी

दोन दिवस जिल्हाभरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, लांजा व राजापूर या तालुक्यांना चांगलेच झोडपून काढले. त्यामध्ये वादळी वाऱयाने 22 जणांच्या घर व इतर मालमत्तेची मोठी पडझड झाली. या झालेल्या नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात जिल्हाभरात सुमारे 3 लाख 91 हजाराची वित्तहानी झाली आहे. सर्वाधिक नुकसान संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यात झाले आहे.

मान्सूनपूर्व पावसाने मंगळवार व बुधवारी रत्नागिरी जिल्हय़ाच्या अनेक भागात जोरदार तडाखा दिला. वादळी पावसाने येथील घरांची मोठी पडझड झाली. तर एका शाळेचेही नुकसान झाले. एका घरावर वीजही पडली. बुधवारी सायंकाळपर्यंत या पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र त्यानंतर रात्री पावसाचा जोर ओसरून गुरुवारी सकाळपासून पुन्हा कडकडीत उघडीप पडली. त्यामुळे जनजीवनही पूर्वपदावर आले.

रत्नागिरी तालुक्यात सुमारे 2 लाखाची हानी

पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनस्तरावर पंचनामा कार्यवाही ग्रामस्तरावर करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात ओरी येथील प्रकाश गणपत आलिम यांच्या घराचे वादळी वाऱयामुळे 36 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. कोतवडे येथील एकनाथ विठ्ठल सनगरे यांच्या घराचे 6 हजार 825 रुपयाचे नुकसान झाले. बसणी येथील उज्ज्वला नामदेव रावणांग यांच्या घरावर वीज पडून 24 हजाराची हानी झाली. पुरुषोत्तम कृष्णा रावणांग यांच्या घराचे 51 हजाराचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यातही घरांची मोठी पडझड

संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील सुनील दौलत बेलकर यांच्या घराचे 1300 रु., लक्ष्मण कोलापटे 2100 रु., चंद्रकांत अजून बाडूल यांच्या घराचे 2500 रु., येथील जिल्हा परिषद शाळा क्र. 2 चे 1 लाख 20 हजाराचे नुकसान, कोड येथील शिवाजी पांडुरंग कदम यांच्या घराचे 8400 रु., तळे येथील कांचन किसन बने यांच्या घराचे 11200 रु., तळेकांटे येथील एकनाथ बने यांच्या घरावर वीज पडून 11000 रु. मुचरी येथील संतोष श्रीपत जाधव यांच्या घराचे 7100 रु. तळेकांटे येथे एमआयडीसी ने बांधलेला बंधारा वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

चिपळूण, गुहागरातही नुकसान

चिपळूण तालुक्यातील गवाळवाडी येथील जयवंत गोपाळ घवाळे यांच्या घराचे 17200 रु., गुहागरमधील उब्रट येथील सरस्वती तानाजी गावगंण यांच्या घराचे 5575 रु., हेदवी येथील श्रीराम काशिनाथ ओक यांच्या घराचे 14000 रु. चे नुकसान झाले आहे.

लांजा, राजापूरमध्येही घरांना तडाखा

लांजामधील साटवली येथील संजय गोणकर यांच्या घराचे 5400 रु., सुनिता माधव गोणकर यांच्या घराचे 36000 रु., राजाराम दौलत गुरव यांच्या घराचे 36000रु., रामचंद्र गोविंद गुरव यांच्या घराचे 20 हजार 500 रु., राजापूर तालक्यातील कोंडेतढ येथील रमेश रामचंद्र वालेकर यांच्या घराचे 8,350 रु., महादेव रामचंद्र नावेरकर यांच्या घराचे 7350 रु.चे नुकसान झाले आहे.

लांजा पूर्व भागातील वीज पुरवठा 48 तास खंडित

लांजा वार्ताहरने कळविल्यानुसार, तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमधील वीज पुरवठा पहिल्या पावसाच्या आगमनाबरोबर खंडित झाला होता. खंडित झालेला हा वीज पुरवठा दुसऱया दिवशी रात्री पूर्ववत करण्यात आला. पहिल्याच पावसात महावितरणची दैना उडाल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तर पूर्वतयारीच्या कामांचा पहिल्याच पावसात बोजवारा उडाल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात 30 मे रोजी सायंकाळी पावसाचे आगमन झाले. मुसळधार पडणाऱया या पावसाबरोबर तालुक्यातील पूर्व भागाच्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हा खंडित झालेला वीज पुरवठा रात्रभर पूर्ववत झालेला नव्हता. त्यामुळे 31 रोजी दिवसभरात वीज पुरवठा पूर्ववत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

नवेदरमध्ये घरावर पडले झाड

जैतापूर वार्ताहरने कळविल्यानुसार, राजापूर तालुक्यातील नवेदर येथे वसंत दामोदर पडय़ार यांच्या घरावरती फणसाचे झाड उफळून पडले. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. यावेळी घरात 6 माणसे असून सुदैवाने घरातील सर्व माणसे सुखरूप असून दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील भोवड यांनी पाहणी करून तलाठय़ाना माहिती देऊन घटनेचा पंचनामा केला. घरावर झाड पडल्याने घराचे किरकोळ नुकसान झाले. अंदाजे 5 हजारपर्यंत नुकसान झाले. गावातील ग्रामस्थांच्या मदतीने घरावरचे झाड तोडून बाजूला करण्यात आले. जोरदार वृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावात पडझड झाली आहे.

राजापुरात अनेक ठिकाणी अंधार

राजापूर प्रतिनिधीने कळविल्यानुसार, गेले 2 दिवस कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने वीज वितरण कंपनीला जोरदार तडाखा दिला आहे. पावसाळय़ापूर्वी करावयाच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष अधिकारीवर्गाची बेपर्वाईमुळे येथील वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्याच्या अनेक भागातील जनता तीन-तीन दिवस अंधारात चाचपडत आहे. तालुक्यातील सागवे पंचक्रोशीसह पर्यटनस्थळ म्हणून मान्यता असलेल्या आंबोळगड गावात वीजच नसल्याने येथील ग्राहक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.तालुक्यातील सागवे ग्रामपंचायत हद्दीत वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढलेले आहेत.

गुजराळी तळीकडे जाणाऱया रस्त्यावरील मोरी कोसळली

शहरातील गुजराळी तळीकडे जाणारा रस्त्यावरील मोरी कोसळल्याने तळीवर जाणारा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान आमदार राजन साळवी यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असून तळीवर जाण्यासाठी तत्काळ मार्ग मोकळा करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. त्यामुळे अर्जुना नदीवरील कोंढेतड मार्गावर टाकण्यात आलेला साकव पर्यायी रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे.

या बाबतचे वृत्त कळताच आमदार राजन साळवी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, स्थानिक नगरसेविका प्रतिक्षा खडपे, मनिषा मराठे, स्वाती बोटले आदींनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. येथील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार साळवी यांनी खचलेल्या मोरीवर लोखंडी साकव टाकण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. त्यानुसार सध्या अर्जुना नदीवरील चिंचबांध-कोंढेतड दरम्यान टाकण्यात आलेला लोखंडी साकव या ठिकाणी वापरण्याचे ठरवण्यात आले.

Related posts: