|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » नादाल, वोझ्नियाकी, बुस्टा उपांत्यपूर्व फेरीत

नादाल, वोझ्नियाकी, बुस्टा उपांत्यपूर्व फेरीत 

फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस : निशिकोरी, स्विटोलिना, प्लिस्कोव्हा, खचानोव्ह चौथ्या फेरीत, 

रेऑनिक, इस्नेर, स्टोसुर, कुझनेत्सोव्हा पराभूत

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दहावे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना स्पेनच्या राफेल नादालने आपल्याच देशाच्या बॉटिस्टा ऍगटचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीने गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच तसेच ओस्टापेन्को व स्पेनचा बुस्टा यांनीही या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जपानचा निशिकोरी, रशियाचा खचानोव्ह, स्विटोलिना, प्लिस्कोव्हा, मार्टिक यांनी चौथे फेरी गाठली तर कुझनेत्सोव्हा, जॉन इस्नेर, समंथा स्टोसुर यांचे आव्हान संपुष्टात आले. याशिवया माजी विजेत्या मिलोस रेऑनिकलाही चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.

निशिकोरीचा संघर्ष, इस्नेर बाहेर

नऊ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया नादालने बॉटिस्टा ऍगटवर 6-1, 6-2, 6-2 असा सहज विजय मिळविला. चौय्या फेरीच्या अन्य एका सामन्यात 20 व्या मानांकित स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाने पाचव्या मानांकित मिलोस रेऑनिकचे आव्हान 4-6, 7-6 (7-2), 6-7 (6-8), 6-4, 8-6 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीच्या सामन्यात रशियाच्या बिगरमानांकित कॅरेन खचानोव्हने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या 21 व्या मानांकित जॉन इस्नेरचे आव्हान 7-6 (7-1), 6-3, 6-7 (5-7), 7-6 (7-3) असे संपुष्टात आणले. अमेरिकेचे एकूण 11 खेळाडू स्पर्धेत उतरले होते. त्यातील इस्नेरचा हा शेवटचा खेळाडू होता. खचानोव्हने मात्र पहिल्यांदाच या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले आहे. आदल्या दिवशी एक सेट झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला होता. जपानच्या आठव्या मानांकित केई निशिकोरीलाही चौथी फेरी गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्याने कोरियाच्या चुंग हय़ेऑनवर 7-5, 6-4, 6-7 (4-7), 0-6, 6-4 अशी मात केली. त्याची पुढील लढत फर्नांडो व्हर्डास्कोशी होईल. फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने आपल्याच देशाच्या रिचर्ड गॅस्केटचा 7-6 (7-5), 5-7, 4-3 असा पराभव केला. गॅस्केटने दुखापतीमुळे माघार घेतली.

कुझनेत्सोव्हा पराभूत

महिला एकेरीत 11 व्या मानांकित वोझ्नियाकीने यापूर्वी 2010 मध्ये शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले होते. त्यानंतर पहिल्यांदाच इथवर मजल मारताना तिने 2009 ची चॅम्पियन स्वेतलाना कुझनेत्सोक्हाचे आव्हान 6-1, 4-6, 6-2 असे संपुष्टात आणले. तिची उपांत्यपूर्व लढत लॅटव्हियाच्या एलेना ओस्टापेन्कोशी होईल. ओस्टापेन्कोने 23 व्या मानांकित समंथा स्टोसुरचा संघर्षपूर्ण लढतीत 2-6, 6-2, 6-4 असा पराभव केला.

स्विटोलिना, प्लिस्कोव्हा चौथ्या फेरीत

युपेनच्या पाचव्या मानांकित इलिना स्विटोलिनाने महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना पोलंडच्या मॅग्डा लिनेटचा 6-4, 7-5 असा पराभव केला. या सामन्यात पावसाच्या व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला होता. स्विटोलिनाने या स्पर्धेआधी रोम व इस्तंबुल येथील स्पर्धा जिंकल्या असल्याने तिला या स्पर्धेची एक संभाव्य विजेती मानले जात आहे. तिची पुढील लढत क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिकशी होईल. मार्टिकने लॅटव्हियाच्या 17 व्या मानांकित ऍनास्तेशिया सेवास्तोव्हाला 6-1, 6-1 असे नमवित आगेकूच केली. अन्य एका सामन्यात झेकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हानेही चौथी फेरी गाठताना जर्मनीच्या करिना विथोएफ्टचा 7-5, 6-1 असा केवळ 70 मिनिटांत पराभव केला. तिची पुढील लढत पराग्वेच्या व्हेरोनिका सीपेडशी होईल. सीपेडने कोलंबियाच्या मारियाना डुक्मयू मेरिनोवर 3-6, 7-6 (7–2), 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.

Related posts: