|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » टेरर फंडिंग : यासीन मलिक अटकेत

टेरर फंडिंग : यासीन मलिक अटकेत 

वृत्तसंस्था/ श्रीनगर

 टेरर फंडिंगप्रकरणी विघटनवादी नेत्यांवर कारवाईचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छाप्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी काश्मीर खोऱयात होणारी विघटनवाद्यांची बैठक रोखली आहे. ही बैठक हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या घरी होणार होती. पोलिसांनी गिलानींचे घर सील करण्याबरोबरच यासिन मलिक याला ताब्यात घेतले आहे.

विघटनवादी नेता मीरवाइज फारुख याला देखील नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. गिलानीच्या घरी केवळ कुटुंबीयांना जाण्याची अनुमती आहे. बैठकीची माहिती पोलिसांना मिळताच गिलानीच्या घरासमोर जवानांना तैनात करण्यात आले. गिलानी आधीपासूनच नजरकैदेत आहेत. याचदरम्यान यासिन मलिक याने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. काश्मीरमध्ये अशांतता फैलावण्यासाठी विघटनवादी नेत्यांना दहशतवादी संघटनांकडून होणाऱया वित्तसहाय्याची चौकशी करणारी एनआयए सातत्याने छापे टाकत आहे. रविवारी देखील एनआयएने काश्मीरात विघटनवादी नेत्यांची घरे आणि इतर ठिकाणी पुन्हा छापे टाकले होते. छाप्यावेळी काही हजार पाकिस्तानी रुपये आणि यूएई तसेच सौदी अरेबियाच्या चलनासह आक्षेपार्ह दस्तऐवज सापडले होते. गिलानीच्या नेतृत्वाखालील तहरीक-ए-हुर्रियतचा प्रवक्ता अयाज अकबर आणि विघटनवादी नेता पीर सैफुल्ला यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता.

याचप्रकारची कारवाई जम्मूतील  उद्योजकाच्या घरी आणि गोदामावर करण्यात आली, हा उद्योजक सीमापार उद्योग घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय आहे.

Related posts: