|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महाकाय मगरीशी अर्धातास झुंज

महाकाय मगरीशी अर्धातास झुंज 

बांदा : मडुऱयात मगरींची संख्या आणि त्यांची दहशत वाढतच चालली आहे. गेल्या पाच वर्षांत अंगावर काटा आणणाऱया अनेक घटना घडल्या आहेत. सोमवारी सायंकाळी असाच एक थरार मडुरे परबवाडीतील अनेक ग्रामस्थांनी अनुभवला. स्थानिक ग्रामस्थ उत्तम परब हे सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांची गुरे घेऊन माळरानावर जात असताना नदीपात्रात दबा धरून बसलेल्या एका महाकाय मगरीने गुरांमधील एका गाभण म्हशीवर अचानक हल्ला चढविला. त्यानंतर सुमारे अर्धातास आठ/दहा ग्रामस्थ आणि त्या मगरीत जोरदार संघर्ष झाला. अखेर ती मगर नदीपात्रात पळाली खरी, मात्र म्हशीला जीव गमवावा लागलाच.

श्री. परब नेहमीप्रमाणे गुरे घेऊन जात होते. नदीपात्रानजीक गुरे पोहोचली असता अचानक गुरांची पळापळ झाली. काय झाले, हे लक्षात येण्यापूर्वीच एका मगरीने एका म्हशीचा जबडाच पकडला होता. महाकाय मगरीच्या ताकदीपुढे त्या म्हशीचे बचावाचे प्रयत्न तोकडे पडले अन् क्षणार्धात ती जमिनीवर आडवी पडली. हादरलेल्या परब यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेथेच काही अंतरावर असलेल्या ग्रामस्थांनी तेथे तात्काळ धाव घेतली अन् सुरू झाला मगर आणि त्या ग्रामस्थांतील संघर्ष. एका बाजूने मगर म्हशीचा जबडा धरून ओढत होती, तर दुसरीकडे म्हशीचे पाय धरून ग्रामस्थ ओढत होते. ग्रामस्थ म्हशीला सोडविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत होते, मात्र महाकाय मगरही म्हशीचा जबडा सोडत नव्हती.

तोवर आणखी काही ग्रामस्थ तेथे पोहोचताच झालेली आरडाओरड व ग्रामस्थांची संख्या पाहून मगरीने नदीपात्रात पळ काढला. मात्र तोवर ती म्हैस मृत्युमुखी पडली होती. झाल्या प्रकाराने उपस्थित सर्वच ग्रामस्थ हादरून गेले. मडुऱयातील मगरींचे संकट किती गडद झाले आहे, याचा या ग्रामस्थांनी थेट अनुभव घेतला. धाकू गावडे, केशव परब, रामा परब, बाबलो परब, हिरोजी परब, पिंटो परब, दिनेश परब, गुरु मातोंडकर आदींसह अन्य ग्रामस्थांनी थेट मगरीशी दोन हात केले. नंतर संपूर्ण गावात ही बातमी पसरताच तो चर्चेचा विषय ठरला. गुरे चारण्यासाठी नेणे आणि आता पावसाळय़ात शेती करणे किती जोखमीचे आहे, हाच मुद्दा प्रामुख्याने पुढे आला. वनपाल पृथ्वीराज चव्हाण यांनी पंचनामा केला. उत्तम परब यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याच गावात गेल्या पाच वर्षांत मगरीच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 15 ते 16 जनावरे या मगरींच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. मगरींनी फडशा पाडलेल्या पाळीव कुत्र्यांची संख्या तर खूपच मोठी आहे. गेल्या दोन वर्षांत तर शेतकऱयांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या. एका शेतकरी महिलेची मगरीने पाठ धरली होती. गेल्यावर्षीच शेतकऱयांसमोर एका बैलाला एका महाकाय मगरीने ओढत नदीपात्रात तळाशी नेले होते. मळेवाड येथे तर गेल्या वर्षी पावसाळय़ात एका ओढय़ात गुरांना घेऊन गेलेल्या शेतकऱयालाच ओढून नेण्याचा प्रयत्न एका मगरीने केला होता. यात त्या शेतकऱयाने हात गमावला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव बचावला होता. काही महिन्यांपूर्वीच एका बैलाचा जबडाच एका मगरीने फोडला होता. या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने यावर कायमस्वरुपी उपाय काय, असा सवाल ग्रामस्थ करीत आहे. की एखादा मोठा अनर्थ घडल्यावरच मगरींची दखल घेण्यात येणार आहे, असाही ग्रामस्थांचा सवाल आहे.