|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » उपांत्य फेरीतील स्थाननिश्चितीसाठी भारत सज्ज

उपांत्य फेरीतील स्थाननिश्चितीसाठी भारत सज्ज 

तुलनेने दुबळय़ा श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा साखळी सामना

वृत्तसंस्था/ लंडन

सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा तब्बल 124 धावांच्या एकतर्फी फरकाने धुव्वा उडवल्यानंतर भारताचा आज (दि. 8) आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध दुसरा साखळी सामना होत असून येथे विजय संपादन केल्यास भारत थेट उपांत्य फेरीत पोहोचेल. भारतीय संघ तुलनेने दुबळय़ा असलेल्या लंकेविरुद्ध फेवरीट मानला जातो. मात्र, या सामन्यादरम्यान 40 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला गेला असून त्याप्रमाणे व्यत्यय आल्यास काही षटके कापली जाऊ शकतात किंवा अगदी सामना रद्द करावा लागल्यास दोन्ही संघांना एक गुण दिला जाऊ शकतो.

कागदावरील संघ पाहता, भारतीय खेळाडू बरेच सरस असल्याचे प्रकर्षाने जाणवते. श्रीलंकेला मात्र अनेक आघाडय़ांवर व्यापक सुधारणा केल्या तरच विजयाची आशाअपेक्षा करता येईल, असे सर्वसाधारण चित्र आहे. भारताने यापूर्वी पाकिस्तानला चारीमुंडय़ा चीत करताना आपली ताकद सिद्ध करुन दाखवली. दुसरीकडे, लंकेला मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला आहे, हे विसरुन चालणार नाही.

2013 मध्ये मागील आवृत्तीत जेतेपद संपादन करणाऱया भारतीय संघाची फलंदाजी मजबूत आहे. शिवाय, कधी नव्हे ती जलद-मध्यमगती गोलंदाजांची देखील समयोचित कामगिरी होत असल्याने यापूर्वी सलामीच्या लढतीत भारत दमदार विजय संपादन करु शकला आहे. लंकेला मात्र प्रदीर्घ कालावधीपासून बहरात येण्यासाठीच अधिक झगडावे लागले असून संगकारा, जयवर्धनेसारख्या अनुभवी खेळाडूंची यंदा त्यांना प्रकर्षाने उणीव जाणवत आहे. भरीत भर म्हणून नियमित कर्णधार अँजिलो मॅथ्यूजला तंदुरुस्तीची समस्या भेडसावत असून याशिवाय तो बहरात देखील नाही. वरिष्ठ सलामीवीर उपूल थरंगाला 2 सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागत असल्याने लंकेच्या जखमेवर जणू आणखी मीठ चोळले गेले आहे.

वास्तविक, महेला जयवर्धने व कुमार संगकारा यांनी 2015 विश्वचषक स्पर्धेनंतर लगोलग वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, त्यांची जागा भरुन काढणारा एकही खेळाडू लंकेच्या दृष्टिक्षेपात नाही, ही त्यांची मुख्य चिंता आहे. दिनेश चंडिमल किंवा चमरा कपुगेदरा सातत्याने संघाचे नियमित सदस्य राहिले. पण, अद्याप ते आपली पूर्ण क्षमता सिद्ध करु शकलेले नाहीत, ही आणखी एक वस्तुस्थिती. साहजिकच, लंकेने भारताविरुद्ध अधिक आक्रमक खेळावर भर देण्याची गरज आहे, असे संगकाराने आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभातून नमूद केले, त्यात आश्चर्याचे काहीच कारण नाही. आपल्या शेवटच्या प्रथमश्रेणी हंगामात कौंटी क्रिकेटमध्ये सरेचे प्रतिनिधीत्व करणारा संगकारा यंदा 4 शतके झळकावत फॉर्ममध्ये आहे. लंकेला मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.

खरे दडपण लंकेवरच

यापूर्वी पाकिस्तानला नमवणाऱया भारतीय संघाची आज लंकेविरुद्ध लढत होत असल्याने येथे त्यांच्यासमोर तितके कडवे आव्हान नसेल. त्यामुळे, आज येथे विजय संपादन केल्यास रविवार दि. 11 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासमोर दडपण असणार नाही. दुसरीकडे, लंकन संघाला मात्र सलामीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला असल्याने येथे त्यांना स्पर्धेतील अस्तित्व कायम राखण्यासाठी झगडावे लागेल.

फलंदाजीच्या आघाडीवर रोहित शर्मा व शिखर धवन उत्तम बहरात असून भारतीय कर्णधार विराट कोहली तर वर्षानुवर्षे लंकेचा कर्दनकाळच ठरत आला आहे. त्यामुळे, आज त्याने पुन्हा लंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला तर त्यात आश्चर्य असू नये. पाकिस्तानविरुद्ध नाबाद 81 धावांची तडफदार खेळी साकारल्यानंतर तो येथे लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल व नुवान प्रदीप यांचा समाचार घेण्यासाठी ताज्या दमाने मैदानात उतरेल. यापूर्वी एजबस्टनवर युवराज पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडला होता. तोच फॉर्म तो येथेही कायम राखण्यासाठी उत्सुक असेल. हार्दिक पंडय़ाची सातव्या स्थानी आक्रमक फटकेबाजी करण्याची क्षमता आणि जलद बळी घेण्याची ताकद भारतीय संघासाठी अधिक उपयुक्त ठरु शकते. अर्थात, दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघाला सामोरे जाण्यापूर्वी धोनीला फलंदाजीचा सराव मिळणे देखील विराटच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध धोनीऐवजी पंडय़ाला बढती देण्यामागे विराटचे अनेक उद्देश होते. त्यात मुख्य उद्देश म्हणजे धोनीचा तो ऍक्यूमलेटर म्हणून अधिक विनियोग करुन घेऊ इच्छितो.

गोलंदाजीच्या आघाडीवर भुवनेश्वरची उत्तम स्विंग गोलंदाजी, उमेश यादवचा वेगवान मारा आणि जसप्रीत बुमराहचे भेदक यॉर्कर्स महत्त्वाचे ठरतील, असा होरा आहे. मोहम्मद शमी व रविचंद्रन अश्विनसारखे दिग्गज गोलंदाज राखीव खेळाडूत आहेत, यावरुन देखील भारताची गोलंदाजीची ताकद स्पष्ट होते. अश्विन भारताचा आघाडीचा गोलंदाज असला तरी येथे विराट ‘विनिंग कॉम्बिनेशन’ बदलणार नाही, असे सध्याचे संकेत आहेत. लंकेसाठी मात्र अनेक आव्हानांचा डोंगर उभा असून मलिंगाची गोलंदाजी कशी होईल आणि कर्णधार मॅथ्यूज कसा खेळतो, यावर त्यांचे यशापयश अवलंबून असणार आहे. ही जोडी अपयशी ठरली तर मात्र लंकेची गत पाकिस्तानसारखीच होईल, हे जवळपास निश्चित असेल.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक.

श्रीलंका : अँजिलो मॅथ्यूज, उपूल थरंगा, दिनेश चंडिमल, निरोशन डिकवेला, चमरा कपुगेदरा, कुसल मेंडिस, कुसल परेरा, थिसारा पेरेरा, सीक्कुगे प्रसन्ना, सुरंगा लकमल, लक्सन संदकन, लसिथ मलिंगा, असेला गुणरत्ने, नुवान कुलसेकरा.

सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.