|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाचा रस्त्याचा भराव खचला

मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाचा रस्त्याचा भराव खचला 

देवगड  : बुधवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाचा जोडरस्ता खचण्याचा प्रकार घडला आहे. तारामुंबरी भागाकडील नव्याने बांधण्यात आलेल्या जोडरस्त्याच्या डाव्या बाजूकडील भराव पाण्यामुळे खचला आहे. तर डांबरीकरण करण्यात आलेल्या भागातही भरावाच्या बाजूने रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाच्या तारामुंबरीकडील भागाचा जोडरस्ता भरावाचे काम नुकतेच करण्यात आले होते. या भरावाच्या बाजूने अद्यापही संरक्षक दगड बसविण्यात आले नाही. तसेच जोडरस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले गटार पुलाच्या टोकाकडे अर्धवट स्थिती ठेवण्यात आल्यामुळे गटारातून वाहून आलेल्या पाण्यामुळे येथील पुलाच्या बाजूचा भराव खचला आहे. तसेच पाण्यामुळे भरावाची माती वाहून गेल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले गटार पुलाच्या खालील बाजूला वस्ती असल्यामुळे हे पाणी सोडण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे गटार अर्धवटस्थितीत करण्यात आले आहे. त्यामुळेच येथील भराव खचण्याचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. तर नव्याने करण्यात आलेला रस्ताही उजव्या बाजूने खचण्याचा प्रकार घडला असून डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या प्रकारामुळे येथील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. पुलावरील वाहतुक मोठय़ाप्रमाणात सुरू झाल्यामुळे तातडीने जोडरस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.