|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » श्रीलंकेचा भारताला पराभवाचा झटका

श्रीलंकेचा भारताला पराभवाचा झटका 

गुणथिलका-कुसल मेंडिसची 159 धावांची भागीदारी निर्णायक

वृत्तसंस्था/ लंडन

आयसीसी चॅम्पियन्स चषकात डावखुऱया शिखर धवनचे धावांच्या आतषबाजीचे ‘अफेयर’ सुरु राहिल्यानंतर देखील भारताला तुलनेने दुबळय़ा भासणाऱया श्रीलंकेविरुद्ध जबरदस्त पराभवाचा झटका सोसावा लागला. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर शिखर धवन (125), रोहित शर्मा (78) व महेंद्रसिंग धोनी (63) यांच्या फटकेबाजीनंतर निर्धारित 50 षटकात 6 बाद 321 धावांचा डोंगर जरुर रचला. पण, प्रत्युत्तरात गुणथलिका (76) व कुसल मेंडिस (89) यांनी दुसऱया गडय़ासाठी 159 धावांची दणकेबाज भागीदारी साकारल्यानंतर लंकेने तोडीस तोड लढत दिली आणि अंतिमतः विजयही संपादन केला. या निकालामुळे उपांत्य फेरीतील निश्चितीसाठी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या लढतीत भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करावाच लागेल.

ब गटातील या लढतीत विजयासाठी 322 धावांचे कठीण लक्ष्य असताना श्रीलंकन सलामीवीर डिकवेला (7) स्वस्तात बाद झाला. पण, त्यानंतर गुणतिलका (72 चेंडूत 76), कुसल मेंडिस (93 चेंडूत 89), पेरेरा (44 चेंडूत 47) यांच्या फटकेबाजीमुळे लंकेने विजयाकडील घोडदौड कायम राखली आणि सरतेशेवटी विराटसेनेला चारीमुंडय़ा चीत करत ‘जोर का धक्का धीरे से लगा’ म्हणजे काय, याचा प्रत्यय आणून दिला.

वास्तविक, पाकिस्तानविरुद्ध 124 धावांनी दणकेबाज विजय संपादन केल्यानंतर या लढतीत भारताला अर्थातच यशश्री प्राप्त करण्यासाठी फेवरीट मानले जात होते. पण, प्रत्यक्षात भारताचे हे सर्व आडाखे अक्षरशः उद्ध्वस्त झाले.

आयसीसी चॅम्पियन्स चषकात डावखुऱया शिखर धवनचे धावांच्या आतषबाजीचे ‘अफेयर’ सुरुच राहिल्यानंतर भारताने श्रीलंकेविरुद्ध दुसऱया साखळी सामन्यात निर्धारित 50 षटकात 6 बाद 321 धावांचा डोंगर रचला. एकीकडे, शिखर धवनने वनडे कारकिर्दीतील 10 वे शतक साजरे करताना 128 चेंडूत 125 धावांची आतषबाजी केली तर दुसरीकडे, रोहित शर्माने देखील तोडीस तोड साथ देताना 79 चेंडूत 78 धावांची तडफदार खेळी साकारली. या जोडीने 138 धावांची तडाखेबंद सलामी दिली, ते देखील विशेष लक्षवेधी ठरले.

ब गटातील या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले खरे. पण, याचा नंतर त्यांना पावलोपावली फटकाच बसत गेला. विशेषतः रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने तर त्यांचा सातत्याने समाचार घेण्यात कसरच सोडली नाही. लंकेला अनुभवी लसिथ मलिंगाकडून बऱयाच अपेक्षा होत्या. पण, नव्या चेंडूवर देखील मलिंगा फारसा प्रभाव टाकू शकला नाही. त्याचे या लढतीतील पृथक्करण 10 षटकांत 70 धावात 2 बळी असे राहिले. मलिंगाने दोन्ही सलामीवीरांना बाद केले असले तरी तोवर या जोडीदारांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.

चॅम्पियन्स चषकात आपले तिसरे शतक साजरे करणाऱया धवनच्या खेळीत 15 चौकार व एका उत्तुंग षटकाराचा समावेश राहिला. सामन्यातील स्लॉग ओव्हर्समध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी देखील निव्वळ लाजवाब ठरली. धोनीच्या खेळीत एकाही हेलिकॉप्टर शॉटचा समावेश नसला तरी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना त्याने अगदी चांगल्या चेंडूंचा समाचार घेण्यातही अजिबात कसर सोडली नाही. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळेच चौथ्या गडय़ासाठी 10.4 षटकात 82 धावांची भागीदारी साकारली गेली. धोनी 34 व्या षटकात फलंदाजीला आला आणि डावातील शेवटच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 52 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह तडफदार अर्धशतक (63) साजरे केले.

धोनीने आपला पूर्ण अनुभव पणाला लावत लंकन गोलंदाजांना हतबल करुन टाकले. शिवाय, कारकिर्दीतील 62 वे अर्धशतकही साजरे केले. केदार जाधवने 13 चेंडूत जलद 25 धावा फटकावल्या. वास्तविक, लंकन कर्णधार अँजिलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, त्यावेळी मलिंगा (2/70), सुरंगा लकमल (1/72) व नुवान प्रदीप (1/73) यांच्या वेगवान माऱयावर त्याची भिस्त होती. पण, प्रत्यक्षात बहरातील धवन-रोहित जोडीने या त्रिकुटाचा शक्य तितका समाचारच घेतला.

विराट, युवराज अपयशी

अर्धशतकवीर रोहित शर्माने मलिंगाच्या गोलंदाजीवर लाँगलेगवर परेराकडे झेल दिला, त्यावेळी लंकेला पहिले यश प्राप्त झाले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व युवराज सिंगचे सपशेल अपयश मात्र डोळय़ात अंजन घालणारे ठरले. डावातील 26 व्या षटकात नुवानच्या बाहेर जाणाऱया चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने ‘ग्लाईड’ करण्याचा विराटचा अंदाज चुकला आणि यष्टीरक्षक डिकवेलाने झेल घेतल्यानंतर लंकन गोटात उत्साहाची लहर उमटली. त्यातच गुणरत्नेने युवराजचा त्रिफळा उडवल्यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला. अनुभवी धोनीने मात्र त्यानंतर आणखी पडझड होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली.

पुढे लेगसाईडकडील छोटय़ा सीमारेषेचा लाभ घेण्याच्या नादात शतकवीर धवनने मलिंगाच्या गोलंदाजीवरच मेंडिसकडे झेल दिला. पंडय़ाने एका षटकारासह धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, याच नादात त्याने लकमलच्या गोलंदाजीवर स्वीपर कव्हरवरील परेराकडे झेल दिला. अर्धशतकवीर धोनी डावातील शेवटच्या षटकात लाँगऑफवरील चंडिमलकडे झेल देत बाद झाला. मात्र, तोवर या माजी दिग्गज कर्णधाराने आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली होती.