|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मुलींनाही कुस्तीसाठी आखाडय़ात उतरवा

मुलींनाही कुस्तीसाठी आखाडय़ात उतरवा 

हिंदकेसरी दीनानाथसिंह यांचे आवाहन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कुस्ती हा कसून केल्या जाणाऱया मेहनतीचा खेळ आहे. फक्त पुरूषांनीच कुस्ती करायची असते, महिलांचा हा प्रांत नव्हे असा मुलींच्या पालकांनी भेदभाव करू नये. उलट मुलींला कुस्तीच्या आखाडय़ात उतरून कुस्तीत करिअर करण्याची संधी द्यावी, असे आवाहन हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी गुरूवारी केले.  

   दंगल सिनेमाचे प्रेरणास्थान महावीर फोगट यांनी आपल्या 2 मुलींसह पुतण्यांना कुस्तीच्या आखाडय़ात आणून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्ल बनविले. फोगट यांच्या पुढाकाराला प्रकाशझोतात आणण्यासाठी क्रीडा पत्रकार व लेखक सौरभ दुग्गल यांनी ‘आखाडा’ हे इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा लिना सोहनी यांनी ‘आखाडा’ याच शिर्षकाखाली मराठीत अनुवाद केला आहे. या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात दिनानाथसिंह बोलत होते. शाहू स्मारक भवनात हा प्रकाशन सोहळा झाला. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. मेहता पब्लिसिंग हाऊसने सोहळ्याचे आयोजन केले होते.

ज्या पालकांना आपल्या मुलींना कुस्ती आखाडय़ात उतरायचे आहे, त्यांनी आखाडा हे पुस्तक जाणिवपूर्वक वाचावे. हे पुस्तक वाचताना महावीर फोगट व त्यांच्या मुलींनी कुस्तीत किती योगदान दिले याचे प्रत्यंतर येईल, असे सांगून  दीनानाथसिंह म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी साताऱयात झालेल्या कुस्ती मैदानात महिला मल्ल कौशल्या वाघ उतरली होती. तीने कुस्तीसाठी दुसरी मल्ल आणा असे हिंदकेसरी मारूती माने यांना सांगितले. मात्र महिला मल्लच न मिळाल्याने मी पुरूष मल्लाशी कुस्ती करतो असे कौशल्याने सांगितले. माने यांनी ही एका तरूण मल्लाला आखाडय़ात आणले. कौशल्याने त्याला घुटणा डावावर अस्मान दाखवून इतिहास रचला. निदान या इतिहासाकडे तरी पाहून पालकांनी मुलींना आखाडय़ात उतरावे. देशातील विविध मल्लांचा एकत्रीत इतिहास लिहिला गेला आहे. मात्र कोल्हापूरी लालमाती व मल्लांच्या एकत्रीत इतिहास लिहिला गेलेला नाही. जाणकारांनी हा इतिहास लिहिण्यासाठी पुढाकार घेतल्यास त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल.  

लेखक दुग्गल म्हणाले, मला उत्तरेकडील मल्लांचा इतिहास माहिती होता. मात्र 2006 साली मास्टर चंदगिराम यांच्याशी झालेल्या भेटीत कोल्हापुरच्या कुस्तीची माहिती मिळाली. ही माहिती घेताना मी खुप प्रभावीत झालो होतो. इतकेच नव्हे तर कोल्हापुरी कुस्तीचे संदर्भ घेऊन मी अनेक लेख लिहिले. 2009 ला माझी महावीर फोगट व त्यांच्या आंतरराष्ट्रीय मल्ल गिता व बबिता फोगट यांच्याशी संपर्क आला. त्यांचे कुस्तीतील योगदानावर मला पुस्तक लिहिण्याचे मोह झाला. त्यातूनच आखाडा हे इंग्रजी पुस्तक लिहिले. पुस्तक लिहिताना गिता व बबिता यांनी घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच आंतरराष्ट्रीय कामगिरी केल्याचे मला जाणवले.

अनुवादक लिना सोहनी म्हणाल्या, दंगल सिनेमामुळे फोगट कुटुंब देशाला कळले. महावीर फोगट यांना आपल्या मुलींना कुस्ती आखाडय़ात उतरविताना खुप त्रास सहन करावा लागला. प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी मुलींना आखाडय़ा उतरविले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरूणींनी कुस्तीत करिअर करण्यासाठी पुढे यावे. मेहता पब्लिसिंगचे मालक सुनील मेहता यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्नेहा दुर्गुळे-इनामदार यांनी सुत्रसंचालन केले.