|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुस्लीम जेवढे अधिक, शत्रूला तितकी अधिक भीती

मुस्लीम जेवढे अधिक, शत्रूला तितकी अधिक भीती 

पाकमधील 38 अपत्यांच्या पित्याचा दावा : 19 वर्षांनंतर शेजारी देशात जनगणना

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

 पाकिस्तानात जवळपास 19 वर्षांनतर पुन्हा जनगणना पार पडली आहे. पाकची लोकसंख्या 20 कोटीच्या नजीक असल्याचे अनुमान व्यक्त केले जात आहे. प्रारंभिक आकडे जुलैच्या अखेरपर्यंत समोर येतील. पाकच्या विकासाच्या मार्गात वाढती लोकसंख्या मुख्य अडथळा असल्याचे तज्ञांचे मत आहे. परंतु येथील बहुतेक लोकांचा दृष्टीकोन यापेक्षा वेगळा आहे. यातीलच एक बलुचिस्तानच्या क्वेटाचा रहिवासी असणाऱया जान मोहम्मद याला 38 अपत्य असून मुस्लीम जेवढे अधिक, त्याच्या शत्रूंना तेवढी अधिक भीती असे त्याचे मानणे आहे.

पाकमध्ये 3 जण असे आढळून आले, ज्यांना 100 पेक्षा अधिक अपत्ये आहेत. जागतिक बँक आणि सरकारी आकडेवारीनुसार दक्षिण आशियात जन्मदर सर्वाधिक असून येथील एका महिलेला सरासरी 3 मुले असतात. जान मोहम्मद याने आपण 100 अपत्यांचा बाप होऊ इच्छित असल्याचे म्हटले असून तो चौथा विवाह करण्याच्या तयारीत आहे. परंतु त्याच्यासोबत कोणतीही महिला विवाहासाठी तयार झालेली नाही, तरी मोहम्मद हार मानण्यास तयार नाही. जान मोहम्मदने आपल्या कुटुंबकबिल्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडेच हात पसरला आहे.

मुलांना क्रिकेटसाठी मित्रांची गरज नाही

बन्नू येथील 87 वर्षीय गुलजार खान यांना 36 अपत्ये असून त्यांचे तीन विवाह झाले आहेत. गुलजारची पत्नी सध्या गर्भवती असून अधिक मुलांबाबत गुलजार आम्ही मजबूत होऊ इच्छितो असे त्याचे म्हणणे आहे. मुले जन्माला येणे निसर्गाचे वरदान असून ही प्रक्रिया मी का रोखू? या मुलांना क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी मित्रांची गरज नाही असे गुलजारने म्हटले.

भावालाही 22 अपत्ये

गुलजार खानचा भाऊ मस्तान खान वजीर यालाही 22 मुले असून 3 पत्नी आहेत. अल्लाहने आम्हा सर्वांना अन्न देण्याचे आणि गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु लोकांचा विश्वास कमजोर होत जातो असे मस्तानचे मानणे आहे.

6 कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच्या तुलनेत वाढत आहे. मागील वर्षी इस्लामाबादने आपल्या विकासविषयक तरतुदीत 40 टक्क्यांची वाढ केली होती. विकासाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास वाढती लोकसंख्या निश्चितपणे मोठी समस्या आहे. यामुळे आरोग्य आणि पोषणावर विपरित प्रभाव पडत असल्याचे सयुंक्त राष्ट्र लोकसंख्या परिषदेच्या संचालिका जेबा सथार यांनी म्हटले. पाकिस्तानात तरुणाईची संख्या अधिक असून रोजगाराचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 6 कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत आहेत. या स्थितीत लोकसंख्येत वेगाने वाढीमुळे विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण होत असल्याचे निरीक्षकांनी म्हटले आहे.

Related posts: