|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » दूरसंचार क्षेत्राच्या कर्जाबाबत बँका साशंक

दूरसंचार क्षेत्राच्या कर्जाबाबत बँका साशंक 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

देशातील दूरसंचार क्षेत्राकडे 4.6 लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याने सरकार आणि बँकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनुत्पादित कर्जाने अगोदरच कठीण वेळेचा सामना करत असलेल्या बँकांची समस्या वाढण्याची शक्यता आहे. भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या प्रतिनीधीच्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रातील कर्ज थकीत होण्याची शक्यता वर्तविली आहे.

पुढील कालावधीत दूरसंचार क्षेत्रातील संकटे वाढण्याची शक्यता आणि अनुत्पादीत कर्जाची प्रकरणे समोर येण्याची भीती या बैठकीत वर्तविण्यात आली. एसबीआयकडून दूरसंचार क्षेत्रासाठी 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. बँकांच्या प्रतिनिधी मंडळाची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र याची तारीख ठरविण्यात आलेली नाही. दूरसंचार आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱयांच्या भागीदारीने चालणारी हा प्रतिनिधी वर्ग दूरसंचार क्षेत्रातील समस्या आणि परिस्थिती सुधारण्यासाठी बँका आणि कंपन्यांशी चर्चा करत आहे.

गेल्या महिन्यात एसबीआय अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दूरसंचार सचिवांना पत्र लिहीत या क्षेत्राच्या कर्जाविषयी शंका उपस्थित केली होती. नवीन कंपन्या आल्याने आणि मोफत सेवा पुरविण्यात आल्याने कर्जाची समस्या गंभीर झाली आहे. यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर आणि एबिडटावर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले.