|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आमदार पुन्हा मालवण तहसीलमध्ये

आमदार पुन्हा मालवण तहसीलमध्ये 

मालवण : शुक्रवारी दाखल्यांसाठी प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई पाहिल्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता आमदार वैभव नाईक पुन्हा तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी वीज वितरण, दूरसंचार आणि महा ई सेवा केंद्राच्या यंत्रणेला बोलावून चांगलेच सुनावले. त्यानंतर संबंधित विभागाने तातडीने आपल्या विभागांची कामे जलदगतीने करीत तहसील कार्यालयातील सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दाखल करून घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व दाखल्यांच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले. तसेच 40 दाखले विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले.

शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी आमदार वैभव नाईक मालवण तहसील कार्यालयात उपस्थित राहिले होते. मात्र दुपारी 2.30 वाजेपर्यंत एकही दाखल न बनल्याने ते कमालीचे नाराज होऊनच परतले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधून महा ई सेवा केंद्राचे अधिकारी मालवणात आल्यानंतर आमदार पुन्हा तहसील कार्यालयात आले. महा ई सेवा केंद्राकडून स्कॅनिंगसाठी येत असलेल्या अडचणी दूर केल्यानंतर सायंकाळच्या सत्रात दहा दाखले बनवून विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. इतर अनेक दाखले प्रलंबित असल्याने आमदार शनिवारी सकाळी पुन्हा तहसील कार्यालयात दाखल झाले.

आमदारांची आक्रमकता

आमदार तहसीलमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रशासनाची चांगलीच हजेरी घेण्यास सुरुवात केली. नंतर वीज वितरण, महा ई सेवा केंद्राचे अधिकारी, दूरसंचार  विभागाच्या अधिकाऱयांनाही त्यांनी चांगलेच सुनावले. मग मात्र सर्व विभागांनी आपापल्या अडचणी सोडविण्यास सुरुवात केली. त्यामुळे इंटरनेटलाही स्पीड मिळाला आणि अडकून राहिलेले 30 दाखले तहसीलदारांच्या टेबलवर पोहोचले. या सर्व दाखल्यांवर सहय़ा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दाखले वितरीत करण्यात आले.

10 जूनपर्यंतचे दाखले पूर्ण – सेतू सुविधा केंद्र

सेतू सुविधा केंद्रात दहा जूनपर्यंत दाखल करण्यात आलेले सर्व दाखले पूर्ण झाले आहेत. संबंधित पालक आणि विद्यार्थी यांनी सदरचे दाखले केंद्रातून घेऊन जावे, असे यावेळी केंद्र संचालक सुनील खरात यांनी स्पष्ट केले. तसेच 16 जूनपर्यंत दाखल करण्यात आलेल्या सर्व दाखल्यांचे स्कॅनिंगही पूर्ण करण्यात आले. सेतू सुविधा केंद्रात एकही दाखल पेंडिंग नाही, असा खुलासा खरात यांनी यावेळी केला.

प्रांताधिकाऱयांच्या शिक्क्याची आवश्यकता नाही – आमदार

जातीचा दाखल बनविल्यानंतर प्रांताधिकाऱयांकडे तो शिक्क्यासाठी जात होता. मात्र प्रांताधिकाऱयांची सही ऑनलाईन पद्धतीने केली जात असल्याने दाखला बनविल्यानंतर शिक्क्यासाठी तो प्रांताधिकाऱयांकडे पाठविण्याची आवश्यकता नाही, असे खुद्द प्रांताधिकाऱयांनी सांगितल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

तहसीलमधील दूरध्वनी सुरू

आमदारांच्या उपस्थितीत शुक्रवारी तहसील कार्यालयाचा दूरध्वनी बंद असल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारी आमदारांनी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱयांना तहसील कार्यालयात बोलावून चांगलेच खडसावले. त्यानंतर तहसीलचा बंद असलेला दूरध्वनी सुरू झाला होता. तसेच तहसीलमधील ‘वाय-फाय’ सेवेचा लाभ अन्य काही लोक घेत असल्याचीही तक्रार आल्याने आमदारांनी याकडेही तहसीलदारांचे लक्ष वेधल्यानंतर तातडीने पासवर्ड बदलून फक्त महत्वाच्या विभागांसाठी वाय-फाय सेवा देण्याची कार्यवाहीही तातडीने करण्यात आली.

 

Related posts: