|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शाहू महाराजांच्या वटहुकुमाचा अंबाबाईच्या श्रीपुजकांकडून अवमान

शाहू महाराजांच्या वटहुकुमाचा अंबाबाईच्या श्रीपुजकांकडून अवमान 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

करवीर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू महाराजांनी करवीर निवासिनी अंबाबाईच्या पुजेसंदर्भात 1913 मध्ये काढलेल्या वटहुकूमाला तथाकथित आणि गैरलागू असे हिणवून अंबाबाईच्या श्रीपुजकांनी दस्तुरखुद्द शाहू महाराजांचा अवमान केला आहे. देवीच्या गाभाऱयाच्या आत देणगी रूपाने मिळणाऱया दागिणे आणि पैशाच्या जोरावर श्रीपूजक मस्तवाल झाले आहेत. शाहू महाराजांचा अवमान करणाऱया श्रीपुजकांनी मंदिरासंदर्भात निर्माण केलेल्या प्रश्नांवर जिल्हा प्रशासनाने येत्या दहा दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढावा. अन्यथा सर्व श्रीपुजकांना अंबाबाई मंदारात प्रवेश करू दिला जाणार नाही, असा खणखणीत इशारा शनिवारी अंबाबाई भाविकांनी येथे झालेल्या बैठकीत दिला. श्रीपूजकांबाबत भाविकांनी भविष्यात कठोर पाऊल उचलल्यास निर्माण होणाऱया कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला जिल्हा प्रशासनच जबाबदार राहिल, असेही यावेळी संतप्त भाविकांनी स्पष्ट केले.

   ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत अंबाबाईच्या पुजेसंदर्भात राजर्षी शाहू महाराजांनी 1913 मध्ये काढलेला वटहुकूम. त्यामध्ये अंबाबाईची पुजा करणारे पुजारी हे नोकर आहेत. अंबाबाईला भाविकांकडून अर्पण करण्यात येणारे दागिणे आणि पैसे हे सरकार जमा करावेत, त्यातील ठराविक हिस्सा नोकर असलेल्या पुजाऱयांना देण्यात यावा. सरकारकडे जमा होणारी पैसे जनहिताच्या योजना, उपक्रमांसाठी वापरण्यात यावेत, असेही वटहुकूमात शाहू महाराजांनी स्पष्ट केले होते. अशी माहिती दिली होती. डॉ. देसाई यांच्या या माहितीनंतर श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने शाहू महाराजांनी काढलेला वटहुकूम तथाकथित आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार तो गैरलागू आहे, असा खुलासा केला होता. शनिवारी ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अंबाबाई भाविकांच्या बैठकीत श्रीपूजकांच्या या खुलाशावरून संतप्त प्रतिक्रिया उमठल्या. बैठकीत भाविकांनी श्रीपूजकांचा कडक भाषेत समाचार घेतला.  प्रजासत्ताक संस्थेच्या दिलीप देसाई यांनी बैठक आयोजनाची भुमिका सांगितली. बैठकीतवटहुकूमाला तथाकतिथ म्हणून हिणवत दस्तुरखुद्द राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱया  श्रीपुजक मंडळाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच अंबाबाईला श्रीपुजकांकडून घागरा-चोळीचा डेस परिधान करणे, अंबाबाईच्या मूर्तीवर पांढरे डाग पडण्याचा प्रकारासह भाविकांनी अर्पण केलेले दागिने, इतर वस्तू आणि पैसे श्रीपुजकांनी घरी नेणे आदी बाबी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत कारवाईची मागणी करण्याची सूचना देऊनही जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे यावेळी दिलीप देसाई यांनी सांगताच उपस्थित भाविकांनी शेम-शेम म्हणून श्रीपुजक आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. युवा इतिहास संशोधन इंद्रजित सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याचे अस्सल पुरावे आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे तब्बल अडीचशे ठराव बुक आहेत. तसेच 1913 मध्ये शाहू महाराजांनी काढलेला वटहुकुम अशी ऐतिहासिक महत्वाची कागदपत्रे पुरातत्व विभागाकडे आहेत. असे असताना श्रीपुजकांनी आपल्या स्वार्थासाठी वटहुकुम तथाकथित असल्याचे सांगणे बेजबाबदारपणाचे आहे. वटहुकुम आजच्या काळातही ग्राहय़ असून जर हा वटहुकुम गैरलागू आहे, असे न्यायालयाने म्हटले असेल तर तो पुरावा श्रीपुजकांनी पुढे आणावा. क्षत्रीय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे दिलीप पाटील म्हणाले, शंकराचार्यांची अंबाबाईच्या मस्तकावर नाग प्रतीक असल्याचे आणि अंबाबाई ही शिवपत्नी असल्याचे सांगितले आहे. मात्र श्रीपुजक शंकराचार्याचाही अवमान करत उलटे सांगत आहेत. अंबाबाई, शंकराचार्याचा अवमान करून भाविकांनी अर्पण केलेले दागिने, पैसे घरी नेणारे श्रीपुजक लुटारू आहेत. यापुढे अंबाबाईला अर्पण होणारे दागिने, पैसे न्यायालयात जमा करण्यात यावेत. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, वटहुकुम अमान्य करण्यामागे श्रीपुजकांची मस्ती दिसते. अंबाबाईचा गाभाऱयाचे मालक आम्ही आहोत, हे सांगण्यासाठी काही श्रीपुजक न्यायालयात गेले होते. पण मी आणि इंद्रजित सावंत यांनी थर्डपार्टी होऊन त्या दाव्यात श्रीपुजकांचे मनसुबे हाणून पाडले. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले, गाभाऱयातील आमचे आणि उंबऱयाबाहेरचे तुमचे ही प्रवृत्ती मोडून काढण्याची वेळ आली आहे. समस्त करवीरकरांनी रस्त्यावर उतरून ही प्रवृत्ती ठेचावी लागेल. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, आमचे आंदोलन ब्राह्मण विरोधी नाही. श्रीपुजकांच्या विकृत प्रवृत्तीच्या विरोधात आहे. श्रीपुजक बैठक, चर्चेला येणार नाहीत, असे म्हणत आहेत. त्यांची भुमिका कोणालाही पटणारी नाही. जिल्हा प्रशासनाने श्रीपुजकांशी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला नाही, तर त्यानंतर अंबाबाईचे भाविकच श्रीपुजकांना अंबाबाई मंदिराचे दरवाजे बंद करतील. एकाही श्रीपुजकाला मंदिरात सोडले जाणार नाही. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि श्रीपुजकांवर राहिल, असा इशाराही संजय पवार यांनी यावेळी दिला. बैठकीला शिवसेना शहर प्रमुख दुर्गेस लिंग्रस, माजी जिल्हा प्रमुख रवी चौगुले, युवा सेनेचे हर्षल सुर्वे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, रिपाइंचे प्रा. शहाजी कांबळे,शरद तांबट, चंद्रकांत बराले, बाबा महाडिक,  गायत्री राऊत, जयश्री खोत, शशिकांत बिटकर, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, पद्माकर कापसे आदीसह भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: