|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला सशर्त जामिन – राज्याबाहेर जाण्यास बंदी

पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला सशर्त जामिन – राज्याबाहेर जाण्यास बंदी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर         

            ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील पहिला संशयीत आरोपी समीर विष्णू गायकवाड याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी शनिवारी सशर्त जामिन मंजूर केला. साक्षीदारांवर दबाव आणू नये, न्यायालयाच्या परवानगी शिवाय राज्याबाहेर जावू नये, कोल्हापूर जिह्यात प्रवेश बंदी, प्रत्येक रविवारी एस. आय.टी. समोर हजेरी यासह 25 हजार रूपयांच्या दोन जातमुचलक्यावर समीरची सुटका करण्यात आली. यासोबतच तपास यंत्रणेने समीर विरोधात दाखल केलल्या दोषारोपपत्रामध्ये ठोस पुराव्यांचा अभाव, साक्षीदारांच्या जबाबातील तफावत, गुह्यातील दुचाकी, हत्यार न सापडणे तपासातील या उणीवामुळे समीर  गायकवाडला जामिन मंजूर केला. दरम्यान या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल करणार असल्याचे सरकारी वकील ऍड. शिवाजी राणे व मेघा पानसरे यांनी सांगीतले.

            16 फेब्रुवारी 2015 रोजी  गोविंद पानसरे व उमा पानसरे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता सकाळी 9 वाजून 25 मिनीटांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी 10 फूट अंतरावरून बंदूकीतून गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये उमा पानसरे व गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले होते. 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचा मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पीटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर पोलीसांनी परीक्षेत्रातील पोलीसांनी 31 पथके तयार करून तपासाची चक्रे गतीमान केली होती.

पानसरे हत्येमध्ये पहिला संशयीत आरोपी समिर

            पोलीसांनी 16 सप्टेंबर 2015 रोजी सांगली येथून सनातनचा पुर्णवेळ साधक समीर विष्णू गायकवाड (वय 32 रा. शंभर फुटी रोड सांगली) याला अटक केली होती. समीरला अटक केल्यानंतर त्याच्या घरझडतीमधून 23 मोबाईल, 31 सीमकार्ड, चाकू, सनातनची पुस्तके, धर्मरथाचे रिडींग बुक जप्त केले. पोलीसांनी 8 जून 2015 पासून समिर गायकवाडचा फोन टॅप करण्यास सुरूवात केली होती. समीरने पानसरे हत्येसंदर्भात अंजली झरकर, ज्योती कांबळे, श्रद्धा पवार, सुमित खामनकर यांच्याशी पानसरे यांच्या हत्येसंदर्भात भाष्य केले होते. याबाबतचे पुरावे पोलीसांनी न्यायालयात सादर केले. तसेच 7 ऑक्टोंबर 2015 रोजी समीर गायकवाडची कळंबा कारागृहात ओळख परेड झाली. यामध्ये 14 वर्षीय शाळकरी मुलाने समीरला ओळखले होते.

समीरच्या  विरोधात 392 पानांचे दोषारोपपत्र

            14 डिसेंबर 2015 मध्ये समीर विरुद्ध पोलीसांनी 392 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये 77 साक्षीदारांचे जबाब, समीरच्या कॉल डिटेल्सचा तपशील, तसेच 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान समीर धर्मरथावर नसल्याचे रिडींग बुकच्या नोंदी सादर केल्या होत्या. समीरवर थेट खून, खूनाचा प्रयत्न, खूनाच्या कटामध्ये सहभागी असणे, हत्यार कायद्याचे उल्लंघन करणे असे आरोप ठेवले होते.

        सीबीआय कडून समीरची चौकशी

            अंधश्रद्धा नुर्मलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱया सीबीआय पथकाने 16 एप्रिल 2016 रोजी समिर गायकवाड याची कळंबा कारागृहात जावून चौकशी केली होती. यामध्ये तपास पथकाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार सीबीआयने 1 जून 2016 रोजी सनातनच्या गोवा, पनवेल येथील आश्रमांवर छापे टाकले होते. यानंतर 10 जून रोजी पनवेल येथून डॉ. विरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय 48 रा. सनातन संकुल, पनवेल जि. रायगड) याला अटक केली होती.

            पानसरे हत्येमधील दुसरी अटक

पानसरे हत्याप्रकरणी एसआयटी पथकाने सीबीआयकडून 2 सप्टेंबर 2016 रोजी विरेंद्र तावडे याचा ताबा घेतला. डॉ. विरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे यांना या प्रकरणातील दुसरा संशयीत आरोपी म्हणून अटक करण्यात आले. 10 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांनी तावडेच्या पनवेल येथील घरावर छापे टाकले. यानंतर त्याला तपास कामी बेळगांव, कर्नाटक येथे नेण्यात आले. यानंतर तावडे यांच्या विरोधात डिसेंबर महिन्यात पोलीसांनी 450 पानी दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये तावडे पानसरे हत्या प्रकरणचा मास्टरमाईंड असून समीर या कटामध्ये सहभागी असल्याचा दावा केला होता. तसेच विनय बाबूराव पोवार, सारंग दिलीप अकोळकर हे पानसरे हत्येमधील अन्य आरोपी असल्याचा खुलासा केला होता.

 

Related posts: