|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बंगला फोडून 20 लाखांचा ऐवज लंपास

बंगला फोडून 20 लाखांचा ऐवज लंपास 

प्रतिनिधी/ सांगली

हरिपूर येथील बंद बंगला फोडून चोरटय़ांनी सोने, चांदी, हिरे आदींचे सुमारे 20 लाखांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या चोरीची ग्रामिण पोलिसांत नोंद झाली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. चोरटय़ांनी शेजारी असलेला बंगलाही फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चोरीनंतर घटनास्थळी श्वानपथक आणण्यात आले मात्र सांगलीच्या दिशेनेच घुटमळले.

मोटारीचे स्पेअर पार्टचा व्यवसाय करणारे अरविंद विनायक केळकर यांचा हरिपूर येथील गजानन कॉलनी येथे अदिराज नावाचा बंगला आहे. केळकर कुटुंबीय बंगल्याला कुलुप लावून दि 16 रोजी सकाळी साडेआठ वाजता पुण्याला गेले. ते शनिवारी दुपारी आले त्यावेळी बंगल्याच्या उत्तर बाजुला असलेला लोखंडी ग्रिलचा दरवाजा तोडून वरच्या मजल्यावरील कपाटात ठेवलेले सोने, चांदी आणि हिऱयाचे सुमारे 20 लाख किंमतीचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी अरविंद केळकर यांनी लगेच ग्रामीण पोलिसांनी याबाबतची माहिती दिली.

 पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जावून पहाणी केली. चोरटय़ांनी प्रथम बंगल्याचा समोरील लोखंडी गील असलेला दरवजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दरवाजा मजबूत असल्याने त्यांनी पाठीमागील बाजुचा लोखंडी ग्रील असलेला दरवाजा पहार किंवा कटावणीने ताकद लावून तोडला. या दरवाजाला आतून तीन कडय़ा होत्या त्याही तोडून त्यांनी आत प्रप्रवेश केला. यानंतर त्यांनी वरच्या मजल्यावर जावून कपाटातील सुमारे 20 ते 30 तोळयाच्या  दागिने लंपास केले. यामध्ये चांदीच्या मूर्त्या, हिरे, आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून याची किंमत 20 लाख असल्याचे बंगल्याचे मालक केळकर यांनी सांगितले. या चोरीची पोलिसांत नोंद झाली आहे. मात्र पावतीनुसार नऊ लाख 86 हजार किंमतीचे दागिने चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.

 चोरटय़ांनी मणीमंगळसूत्र, हिरे जडीत कानातील टॉप्स, भिकबाळी, सोन्याची चेन, सोन्याचे पेंडंट, नाकातील चमकी, प्युअर सोने असलेल्या बांगडय़ा, सोन्याची टिक, सोन्याचा बेल्ट असलेले लेडीज आणि जेन्टस्चे घडय़ाळ, सोने व मोत्याचे तणमणी, सोने, मोती आणि हिऱयाचे नेकलेस, सोन्याच्या दोन अंगठय़ा, सोन्याची रूबी चेन, देव्हाऱयातील चांदीची दत्ताची मूर्ती, चांदीची गणेशमूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती, चांदीचा उंदीर, चांदीचा बाळकृष्ण, देव्हाऱयावरील देवाचे सिंहासन, सोन्याची बाली, मंगळसूत्र, चांदीचे ब्रेसलेट,  आणि रोख आठ हजार असा सुमारे नऊ लाख 86 हजाराचा ऐवज लंपास केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक मिलिंद कांबळे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आणखी एक बंगलाही फोडण्याचा प्रयत्न

चोरटय़ांनी प्रथम केळकर यांच्या शेजारी असलेला भिडे यांचा बंगला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी त्यांना यश आले नाही त्यानंतर त्यांनी केळकर बंगल्यात चोरी केली. या चोरीमध्ये किमान चार ते पाच चोरटे असण्याची शक्यता आहे. त्यांनी मजबूत असलेला लोखंडी ग्रीलचा दरवाजा मोठी ताकद लावून तोडल्याचे दिसत आहे. हरिपूर परिसात गेल्या चार ते सहा महिन्यात चोरीच्या घटना वाढल्या असून ही चौथी चोरी असल्याचे सांगण्यात आले.