|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान

अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान 

@ पुणे / प्रतिनिधी

जाईन गं माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा । आपुलिया ।।

विठुयारायाची भेटी आस…टाळ-मृदंगाचा अखंड गजर…त्या तालावर डौलणारे वारकरी…अन् सर्वत्र भरून राहिलेला भक्तीचा दरवळ…अशा अत्यंत प्रसन्न वातावरणात व पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने अलंकापुरीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. वैष्णवांची मांदियाळी व विठुनामाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली.

राज्याच्या कानाकोपऱयातून आलेले लाखो वारकरी इंद्रायणी काठी एकवटलेल्या इंद्रायणीला जणू महापूरच आला होता. विठ्ठलभक्तीच्या या शीतल वर्षावात आळंदी आज अक्षरशः चिंब-चिंब झाली. पहाटे चार व<ाजता मुख्य मंदिरात घंटानाद घणघणला आणि सोहळयाला सुरुवात झाली. काकड आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती हे धार्मिक विधी विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते पार पडले. पहाटे पाच ते सकाळी नऊ यादरम्यान भाविकांच्या महापूजा आणि श्रींचे समाधी दर्शन सुरू करण्यात आले. दुपारी बारापर्यंत श्रींच्या समाधी दर्शनास गाभारा भाविकांसाठी खुला राहिला. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत श्रींचा गाभारा स्वच्छ करून समाधीस जलाभिषेक, महानैवेध्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी दोनपर्यंत श्रींच्या दर्शनासाठी गाभारा खुला राहिला. श्रींच्या वैभवी प्रस्थान सोहळ्यासाठी 47 दिंडय़ांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी दुपारी पावणे तीनला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘श्री’ंना आभूषित करण्यात आले. पालखी सोहळयासाठी माउलींना भरजरी वस्त्र, मेखला चढविल्यानंतर चांदीचा मुकुट, सर्व दागदागिने आणि फुलांनी सजविण्यात आले.

प्रस्थान सोहळ्यातील कार्यक्रमात श्रीगुरु हैबतरावबाबा यांच्यातर्फे आरती, त्यानंतर संस्थानतर्फे श्रींची आरती करण्यात आली. विणामंडपातील पालखीत श्रींच्या चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर दिंडी प्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी पालखी प्रस्थान सोहळयाची लगबग सुरू झाली. टाळ-मृदंग आणि ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात दिंडय़ांनी महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. अंकली (बेळगाव) येथील ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व महाद्वारातून मंदिरात आल्यानंतर टाळ-मृदंगाचा स्वर टीपेला पोहोचला. अशा भारलेल्या वातावरणातच माउलींचा जयघोष करत आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेत पंधरा मिनिटे नाचविली आणि वीणामंडपातून उचलून बाहेर आणली. पालखीने सायंकाळी पावणे सातच्या सुमारास प्रस्थान ठेवले अन् वारकऱयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. खांदेकऱयांनी मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा पूर्ण केली व रात्री साडेसातच्या सुमारास सोहळा जुन्या गांधीवाडय़ाच्या जागेत मुक्कामासाठी विसावला. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास गांधीवाडय़ातील आजोळघरातून श्रींचा वैभवी पालखी सोहळा आळंदीकरांचा भावपूर्ण निरोप घेत पुण्यनगरीकडे वाटचाल करणार आहे.

Related posts: