|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा

जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा 

प्रतिनिधी, मुंबई

पुढारी आणि धनदांडग्यांचा काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून असलेल्या जुन्या नोटा न स्वीकारण्याची भूमिका घेणाऱया केंद्र सरकारने बुधवारी जिल्हा बँकांना दिलासा दिला. केंद्राच्या निर्णयानुसार, जिल्हा बँकांना चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा येत्या 20 जुलैपर्यंत रिझर्व्ह बँकेत जमा करता येतील.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांसमोरील तरलतेचा तसेच शेतकऱयांना वाटप करायच्या पीक कर्जाचा प्रश्न सुटणार आहे. चालू खरीप हंगामात शेतकऱयांना 13 हजार 548 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा बँकांना देण्यात आले आहे. केंदाच्या निर्णयामुळे जिल्हा बँकांचे हे लक्ष्य साध्य होईलच शिवाय शेतकऱयांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देणे शक्य होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर नागरिकांनी बँका, टपाल कार्यालय आणि जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या. जिल्हा बँकांमध्ये एकूण 4 हजार 600 कोटी रुपये जमा झाले होते. नोटा बदली करण्याची मुदत उलटून गेल्यानंतर 27 जिल्हा बँकांकडे 2 हजार 771 कोटी रुपये पडून होते. जिल्हा बँकेत शिल्लक राहिलेल्या जुन्या नोटा या स्थानिक पुढाऱयांच्या, बँक संचालकांच्या असल्याचे गृहीत धरून केंद्र सरकारने अशा बँकेच्या संदर्भात कडक भूमिका घेतली होती. जुन्या नोटांनी चेस्ट रूम खचाखच भरल्यानंतर सरकारकडून कोणताही निर्णय होत नसल्याने जिल्हा बँका हवालदिल झाल्या होत्या.

एकाबाजूला पडून असलेला पैसा आणि दुसऱया बाजूला ग्राहकांच्या ठेवींवर द्यावे लागणारे व्याज जिल्हा बँका आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून जिल्हा बँकेतील जुन्या नोटा स्वीकारण्याची विनंती केली होती. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जिल्हा बँकेतील जुन्या नोटा स्वीकारण्याचा आग्रह धरला होता. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जिल्हा बँकेतील जुन्या नोटा स्वीकारण्याची सूचना रिझर्व्ह बँकेला केली आहे.

10 ते 14 नोव्हेंबर 2016 या दरम्यान जिल्हा बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटा 30 दिवसाच्या आत म्हणजे येत्या 20 जुलैपर्यंत रिझर्व्ह बँकेत भरता येणार आहेत. टपाल कार्यालयांनाही 20 जुलैपर्यंत जुन्या नोटा जमा करता येतील. जुन्या नोटा जमा करताना दिलेल्या मुदतीत या नोटा का जमा केल्या नाहीत? याचे संयुक्तिक कारण संबंधित बँका आणि टपाल कार्यालयाला द्यावे लागणार आहे.

 बँकांकडे जमा असलेले बाद चलन

बँका                रक्कम

पुणे                 811 कोटी

सातारा              399 कोटी

नाशिक             376 कोटी

चंद्रपूर              356 कोटी

जिल्हा बँकांना आर्थिक संजीवनी

जुन्या नोटा येत्या 20 जुलैपर्यंत आरबीआयमध्ये जमा करता येणार

नोटा मुदतीत का जमा केल्या नाहीत याचे स्पष्टीकरण द्यावे लागणारे

नोटा बदलून मिळणार असल्याने बँकांसमोरील तरलतेचा प्रश्न सुटेल

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत जिल्हा बँकांना मदत

 

Related posts: