|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कर्जमाफी ही फॅशन झालीय

कर्जमाफी ही फॅशन झालीय 

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचे वादग्रस्त विधान

शिवसेनेसह काँग्रेसची नायडूंवर टीका

कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही

मुंबई / प्रतिनिधी

हल्ली कर्जमाफीची मागणी ही फॅशन झाली आहे, असे खळबळजनक विधान केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी येथे केले. राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी झालेले आंदोलन थंडावले असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने कर्जमाफीच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने भाजपची अडचण झाली आहे.

व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत गुरुवारी पुणे महापालिकेचा पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना नायडू यांनी कर्जमाफीच्या मागणीची खिल्ली उडवली. लोकांना मोफत देण्याचा जमाना आता गेला आहे. निवडणुकीपूर्वी टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र मोफत देण्याची घोषणा केली जाते. मात्र, अशा घोषणा म्हणजे निव्वळ लॉलीपॉप आहेत, असे नायडू म्हणाले.

कर्जमाफीसारख्या मागणीचा विचार हा शेतकरी संकटात असताना झाला पाहिजे. शेतकऱयांचे कर्ज माफ करण्यास काहीच हरकत नाही. पण तो अंतिम उपाय नाही. शेतकऱयांनी पिकवलेल्या मालाला योग्य किंमत मिळायला हवी. त्यासाठी शेतकऱयांना गोदाम, शीतगृहे, मालाची वेगवान वाहतूक आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्या दिशेने काम करीत आहे, अशी पुस्तीही नायडू यांनी जोडली.

दरम्यान, नायडू यांच्या विधानावर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसह

काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. शेतकऱयांनी विश्वास व्यक्त केल्याने हे सरकार सत्तेवर आले. तरीही शेतकऱयांना योग्य दर मिळत नसताना केंद्रीय मंत्र्यांनी अशी विधाने करणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिली. तर नायडूंचे विधान हे असंवेदनशील असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वप्रथम उत्तरप्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनेच शेतकऱयांचे कर्ज माफ केल्याचे निदर्शनास आणले.

Related posts: