|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत विद्यार्थ्याची आत्महत्या

सावंतवाडीत विद्यार्थ्याची आत्महत्या 

सावंतवाडी  : येथील कळसुलकर हायस्कूलचा दहावीतील विद्यार्थी रितेश विलास म्हाडेसर (16) याने शुक्रवारी मध्यरात्री चराठा-वझरवाडी येथे आपल्या जुन्या कौलारू घराच्या वळईतील छपराच्या वाशाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु आईने खासगी क्लासला का गेला नाहीस, अशी विचारणा केल्याच्या रागातून त्याने हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच जुन्या घरापासून काही अंतरावर स्वतःच्या जमिनीत त्याच्या काकाने रितेशची आई तसेच लहान काकाला एकत्र नवीन घर बांधून दिले होते. त्या घरात दोन महिन्यापूर्वी रितेश, त्याची आई व लहान भाऊ राहायला गेले होते. रितेशच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी हार्ट ऍटॅकने निधन झाले आहे. त्यामुळे आई मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते.

रितेशने शुक्रवारी रात्री दहा वाजता नवीन घरात आपल्या आई-भावासमवेत जेवण केले. घरातील सर्व झोपी गेल्यावर रितेश घरातून बाहेर पडला असावा. शनिवारी सकाळी रितेश घरी दिसला नाही, त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू केली. जुन्या घरात येऊन पाहिले असता तेथील वळईमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत रितेश दिसला. यापूर्वीही रितेश अभ्यास करण्यासाठी जुन्या घरात जायचा.

रितेशचे कपडे भिजलेले

रितेश जुन्या घराकडे येताना पावसात भिजला होता. त्या भिजलेल्या अवस्थेतच त्याने गळफास घेतल्याची शक्यता आहे. तसेच त्याने जुन्या घरात येण्यापूर्वी घरालगत असलेल्या विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा होती.

रितेशचे काका दिनेश म्हाडेसर हे रेल्वेतून डय़ुटी संपवून घरी आल्यानंतर हा
प्रकार समजला. त्यांनी पोलीस पाटील सचिन परब यांना माहिती दिली. पोलीस ठाण्यात दिनेश म्हाडेसर यांनी खबर दिली. रितेशच्या पश्चात आई, लहान भाऊ, काका, काकी, आजी, चुलतभाऊ असा परिवार आहे.

मला शोधू नका…

रितेशने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वहीत मजकूर लिहून ठेवला आहे. त्यात ‘मला कोणीही शोधू नका म्हणान सांगतंय. जातलंय खय ता माहीत नाय… आपला रितेश.’ असा मजकूर लिहून ठेवला होता. ती वही पोलिसांनी जप्त केली. तसेच त्याचा मोबाईलही पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतला आहे.

शिक्षकांसह ग्रामस्थांची धाव

रितेश कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्या केल्याची माहिती समजताच त्याच्या मित्रपरिवाराला तसेच शिक्षकांना धक्काच बसला. मुख्याध्यापक चंद्रकांत काटे, शिक्षक नारायण मानकर, विजय पेडणेकर, सुबोध वराडकर, गवस आदींनी रितेशच्या घरी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थ, पोलीस पाटील सचिन परब उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक धनावडे यांची भेट

रितेशने ज्या घरात गळफास लावून आत्महत्या केली, तेथे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी जाऊन पाहणी केली. तसेच त्याच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने, हवालदार मंगेश शिंगाडे, विलास नर, प्रमोद काळसेकर, आर. एन. गवस यांनी पंचनामा केला.

रितेश धाडसी, हुशार

रितेश हा धाडसी होता. पावसाळय़ात मासे, कुर्ल्या पकडण्याचा त्याला छंद होता. त्याला पेहताही येत होते. शाळेतही तो हुशार होता. खेळातही सहभाग घेत होता.