|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » मनोरंजन » बापलेकाची हृदयस्पर्शी कहाणी ‘रिंगण’

बापलेकाची हृदयस्पर्शी कहाणी ‘रिंगण’ 

वितरक न मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित राहावं लागत आहे. या यादीतील काही नावं म्हणजे कासव, दशक्रिया, हलाल… याच यादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं रिंगण… मात्र या दुष्टचक्रातून रिंगण चित्रपटाची मुक्तता झाली आहे.

सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 व्या राष्ट्रीय पुरस्कारावर रिंगणने मोहोर उमटवली. त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांत चित्रपट, दिग्दर्शन, पदार्पण (दिग्दर्शक), अभिनेता, छायाचित्रदिग्दर्शन,    बालकलाकर या पुरस्करांवर आपले नाव कोरले. त्याशिवाय कान, स्टट्टगर्ट (जर्मनी), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिलं. या राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारा रिंगण अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आपली निर्मिती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधी कासलीवाल यांनी प्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवणारा, मकरंद माने दिग्दर्शित रिंगण प्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित रिंगण 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाद्वारे अजय गोगावले पुन्हा एकदा पंढरपूरच्या विठाईला साद घालण्यासाठी आणि समस्त श्रोत्यांना आपल्या तालावर नाचविण्यासाठी देव पहिला म्हणत सज्ज झाला आहे. अजय रिंगणात अडचणीत सापडलेल्या एका बाप -लेकाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला आपल्या सुरेल गाण्याने साद घालत आवाहन करीत आहे. पांडुरंग आणि पंढरपूर म्हटलं की अजयचं माऊली माऊली रूप तुझे हे गाणं डोळय़ासमोर आल्याशिवाय राहत नाही. या गाण्याने फक्त पंढरपूरच नव्हे तर अखंड महाराष्ट्र भारावून गेला होता. विधी कासलीवाल प्रस्तुत रिंगण या चित्रपटाची गाणी रोहित नागभीडे यांनी संगीतबद्ध केलेली असून वैभव देशमुख याने ती लिहिली आहेत.

Related posts: