|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रायबंदर अपघातात खोर्लीतील युवक ठार

रायबंदर अपघातात खोर्लीतील युवक ठार 

पणजी

रायबंदर-पाटो येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 21 वर्षीय युवक जागीच ठार झाला. कारचालक व दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहेत. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे.

ठार झालेल्या युवकाचे नाव रोहन वासुदेव परब (21, हाऊसिंगबोर्ड कॉलनी खोर्लीमळार) तर जखमीचे नाव सुरज नाईक (30, पीडीए कॉलनी खोर्लीमळार) असे आहे. जीए 07 व्हाय 3899 क्रमांकाच्या दुचाकीवरून ते दोघेही पणजीहून ओल्ड गोव्याच्या दिशेने जात होते. रायबंदर पाटो येथे पोहोचले असता समोरून विरुद्ध बाजूने (राँगसाईड) आलेल्या जीए 05 बी 5090 क्रमांकाच्या मारुती कारशी त्यांची समोरासमोर टक्कर झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीवरील दोघेही मांडवी नदीत फेकले गेले.

अपघातामुळे दोघेही मांडवीत फेकले गेले

अपघाताचा जोरदार आवाज ऐकू आल्यामुळे जवळपास असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेच पोलिसांना व 108 लाही कळविले. त्याच दरम्यान काही लोकांनी नदीत उडी मारून सुरज नाईक याला त्वरित बाहेर काढले. मात्र दोघेजण पाण्यात पडलेले असावेत याची कल्पना नसल्यामुळे त्यांनी शोध थांबवला. सुरज याच्यावर रुग्णवाहिकेत उपचार सुरु असताना एका पत्रकाराने त्याच्याकडे विचारपूस केली असता कळले की त्याच्याबरोबर आणखी एकजण होता आणि तोही पाण्यात पडला असावा. दुर्दैवाने बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे रोहनचा बुडून मृत्यू झाला.

अत्यंत गरिबीतून परिश्रमपुर्वक पुढे आलेला रोहन

रोहन परब हा हाऊसिंगबोर्ड कॉलनी तसेच खोर्लीमळार परिसरात सुस्वभावी मुलगा म्हणून परिचित होता. कुणीही सांगितलेली कामे करायचा. अत्यंत गरीबीतून पुढे आलेला हा तरुण खूप कष्टाळू होता. आयटीआयचे शिक्षण पूर्ण करुन त्याची गोवा शिपयार्डमध्ये दोन वर्षांच्या खास प्रशिक्षणासाठी निवडही झाली होती, अशी माहिती मिळाली. त्याचे आईवडिल बारिकसारिक कामे करुन कुटुंब चालवितात. तिघा बहिणींचा रोहन हा एकमेव भाऊ होता. त्याच्या मृत्यूमुळे खोर्लीमळार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.