|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कोकणात काळय़ा धंद्यांचे बस्तान!

कोकणात काळय़ा धंद्यांचे बस्तान! 

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कोटय़वधी रूपयांचे पॅकेज मिळवून गोवा व केरळशी पर्यटनदृष्टय़ा स्पर्धा करण्यासाठी सज्ज असलेल्या कोकणात वाढत चाललेले काळे धंदे चिंतेत भर टाकत आहेत. गेल्या दीड-दोन वर्षात खवले मांजरांची खवले, रक्तचंदन, बिबटय़ाचे कातडे तस्करीचा तपास सुरू असतानाच केटामाईन या अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आल्याने काळय़ा धंद्यांचे केंद्र अशी नकारात्मक ओळख बनू लागली आहे.  अलिकडच्या काळातील या सर्व घटनांशी परराज्यातील तस्करीचे असलेले कनेक्शन आणि त्याची पोलखोल करण्यास आलेले अपयश गुन्हेगारी कृत्य करणाऱयांच्या पथ्यावर पडलेले आहे. तस्करीच्या या साऱया घटना कोकणची साहित्यिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया चिपळूण नगरीत घडल्या हे विशेष.

निसर्गसंपन्नतेने नटलेल्या कोकणला काळय़ा धंद्यांचे ग्रहण लागले आहे. त्यावर नियंत्रण मिळण्याऐवजी त्यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रकरणाची भरच पडत चालली आहे. कोकणला लाभलेली अथांग समुद्र किनारपट्टी ही सुरूवातीच्या काळात तस्करीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखली जात असे. मात्र कालांतराने ती तस्करी मोडीत काढली गेल्यानंतर मधल्या काळात तसे कोकण शांत होते. मात्र अलिकडच्या म्हणजेच वर्ष-दोन वर्षापासून गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे दिसू लागले आहे. यामध्ये उघडकीस आलेल्या गुन्हेगारी कारवायांमध्ये तपासी यंत्रणेच्या हाती फारसे काही न लागल्याने अथवा त्यांचा दराराही कमी झाल्याने गुन्हेगारांना बस्तान ठोकण्यास मोकळीक मिळाली आहे. यातील बहुतांशी घटना या वनविभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या मर्यादा पुरत्या उघडय़ा पडलेल्या आहेत. त्यामुळे अशा या विभागाकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दापाश करण्याची स्वप्ने पाहणे चुकीचे आहे.

दीड वर्षापूर्वी चिपळूणसह उत्तर रत्नागिरीत खवले मांजरांच्या खवल्यांची तस्करी उघडकीस आली. दोन कारवायांमध्ये सापडलेल्या या खवल्यांच्या तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असल्याचे नंतर उघड झाले. बेळगाव ते चिपळूण असे कनेक्शन असल्याने त्यादृष्टीने तपास राष्ट्रीय स्तरावरून सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नसतानाच गेल्या सहा महिन्यांपूर्वी शहरातील गोवळकोट रोड परिसरात चारठिकाणी धाडी टाकून एकूण 9.796 घनमीटर इतके तब्बल 412 रक्तचंदनाचे ओंडके जप्त करण्यात आले. साधारणपणे तब्बल 14 टन असलेल्या या चंदनाची किंमत परदेशातील चलनानुसार कित्येक कोटीत आहे. या प्रकरणातही आंतराराष्ट्रीय रॅकेट असल्याचे सांगत तपास सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा सूत्रधार असलेला इसा हळदे हा अजूनही वनविभागाच्या हाती लागलेला नसून आता न्यायालयाकडून तो फरार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर  या महिन्यात 8 जून रोजी चिपळुणातील निवळी येथे साडेसात लाखाचा खैर जप्त करण्यात आला. भिवंडीतील वनविभागाच्या राखीव जंगलातून चोरून तो येथील कातभट्टीवर आणला गेला होता. या प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच जून महिन्यात कुंभार्ली घाटात चेकनाक्यावर पाच लाखाचे बिबटय़ाचे कातडे व कार जप्त करण्यात आली. यामध्ये चिपळुणात कातडे विक्रीसाठी घेऊन येणाऱया पाटण येथील तरूणाला अटक करण्यात आली.

या सर्व घटनांत केटामाईन या अंमली पदार्थ विक्री प्रकरण सर्वासाठी धक्कादायक आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीतून तेथे काम करणाऱया कामगाराने दररोज थोडी थोडी पावडर चोरत जमा केलेली तब्बल 10 किलो 880 ग्रॅम वजनाची सुमारे नऊ कोटीची पावडर बाहेर विक्री करताना पोलिसानी सदर कामगारासह एकूण तिघांना अटक केली आहे. मुळातच इतक्या मोठय़ाप्रमाणात सापडलेल्या केटामाईन ड्रग्जची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यादृष्टीने या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे होते. मात्र दोन कारवायात केटामाईन सापडल्यानंतर पोलिसी तपास पूर्णपणे थंडावलाच. एवढेच नव्हे तर दहा दिवसांतच ज्या कंपनीतून ही अंमली पावडर चोरली गेली त्या कंपनीचे मालक आणि व्यवस्थापन यांचा यामध्ये काहीच संबंध नसल्याचे सांगत तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी चक्क क्लिनचिट देऊन टाकली.

तसे पाहिले तर तीन वर्षापूर्वीही येथे सापडलेले केटामाईन याच कंपनीतून चोरले गेले होते. त्यानंतर सलग दुसरी घटना घडल्यानंतर त्यातील गांभीर्य ओळखून त्यादृष्टीने तपासाची दिशा आवश्यक होती. मुळातच ही अंमली पावडर रेव्ह पाटर्य़ामध्ये नशा येण्यासाठी वापरली जाते. चोरटय़ा मार्गाने विक्री केल्यास साधारणपणे 80 लाख किलोमागे मोजले जातात. त्यामुळे याचे उत्पादन करणाऱया कंपनीकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना आणि काळजी घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज फूड आणि ड्रग्ज विभागाने कंपनीचे उत्पादन थांबवले आहे. ही कारवाई वगळता बाकी सारे मोकाट आहेत. आज कोकणात ठिकठिकाणी अंमली पदार्थ विकले जात आहेत. यातून तरूण पिढी याला बळी पडत आहे. त्यामुळे अशा घटनांच्या मुळाशी जाणे महत्वाचे ठरते.

मुळातच कोकणात आणि विशेषत: रत्नागिरी जिल्हय़ात वाढत असलेले गुन्हेगारी प्रस्थ आणि त्याचा सुरू असलेला तपास पहाता याला आळा बसेल असे म्हणणे धाडसाने ठरणारे आहे. आतापर्यंत घडलेल्या घटनेत मुळाशी तपास यंत्रणा न गेल्याने तपास अधांतरीच लटकत राहिला आहे. त्यामुळे कायद्याचा धाकच गुन्हेगारी कृत्य करणाऱयाना राहिलेला नाही. केटामाईन प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी आवाज उठवत कंपनी बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनीही त्यांचीच री ओढली आहे. मात्र तीन वर्षापूर्वी जाधव यांच्याच मंत्रीपदाच्या कारकीर्दीत केटामाईन सापडले होते. कंपनी बंद हा त्यावरील पर्याय नाही. यातून शेकडो कामगार देशोधडीला लागतात. त्यामुळे त्यासंदर्भात सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि गैरकृत्यावर नियंत्रण कसे येईल हे पहाणे महत्वाचे ठरते.

तसे पाहिले चिपळूण नगरीची ओळख ही कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उंच शिखरावर असलेल्या या नगरीने आपला वारसा आतापर्यंत जपला आहे. असे असतानाच अलिकडच्या काळात तस्करी अथवा चोरटय़ा कारवाईचा केंद्रबिंदू ही नगरीच राहिली असल्याने या शहराची वेगळी ओळख नकाशावर येऊ लागली आहे. त्यामुळे चिपळूण काळय़ा धंद्यांचे माहेरघर तर ठरत नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.