|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मेळाव्याच्या औपचारिकतेपेक्षा शेतकऱयांपर्यंत पोहोचा!

मेळाव्याच्या औपचारिकतेपेक्षा शेतकऱयांपर्यंत पोहोचा! 

दोडामार्ग : शासनाच्या प्रत्येक योजना तळागाळातील गोरगरीब शेतकऱयांपर्यंत पोहोचत नसल्याने जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना चांगलेच फटकारले. कृषी मेळावे घेण्यापेक्षा ग्रामीण भागातील गोर-गरीब शेतकऱयापर्यंत पोहचा व त्यांना योजनांचा लाभ द्या, असा इशारा जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी दिला.

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती दोडामार्ग व मोरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोरगाव प्राथमिक शाळेत कृषी मेळावा झाला. या मेळाव्यात जि. प. सदस्य राजन म्हापसेकर बोलत होते. यावेळी त्यांनी कृषीच्या कोणत्याच योजना हय़ा दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱयापर्यंत पोहचत नसल्याने त्यांनी कृषी अधिकारी कांबळे व गटविकास अधिकारी सिद्धार्थ अजवेलकर यांना चांगलेच धारेवर धरले. अशा गैरकारभार करणाऱया अधिकाऱयांचे वर्तन आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गणपत नाईक हे होते. यावेळी व्यासपिठावर उपसभापती सुनंदा धर्णे, जि. प. सदस्य संपदा देसाई, राजेंद्र म्हापसेकर, पं. स. सदस्य लक्ष्मण नाईक, धनश्री गवस, गटविकास अधिकारी सिद्धार्थ अजवेलकर, महिला बालविकास दोडामार्गच्या ममता देसाई, प्रगतशिल शेतकरी झिला पाटयेकर, डॉ. तुषार चिपळुणकर, प्रेमानंद देसाई, हेवाळे सरपंच संदीप देसाई, पाल खुर्द सरपंच संगीता देसाई आदी उपस्थित होत्या. यावेळी तालुक्यातील व जिल्हय़ात गावाचे नावलौकीक करून आदर्श पुरस्कार मिळविणाऱया हेवाळे सरपंच देसाई, केर सरपंच प्रेमानंद देसाई, पाल खुर्द सरपंच संगीता देसाई या तीन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. तर प्रगतशील 29 शेतकऱयांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून नावाजलेले कै. वसंत नाईक यांच्या 104 वी जयंती साजरी केली. वसंत नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने या कृषी मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.

दरम्यान, कृषी विभागाच्या 100 टक्के अनुदानानुसार शेतकऱयांना कलमे दिली जातात. त्यानंतर त्याची किती वर्षाची गॅरेन्टी असते. ती रोपे मेल्यानंतर त्या मृत झाडांची नोंद कमी करून क्षेत्र लागवडीसाठी पुन्हा 100 टक्के अनुदानानुसार शेतकऱयांना रोपे मिळण्याची विनंती जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केली.