|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गीतसुमनांजलीने कराडकर मंत्रमुग्ध

गीतसुमनांजलीने कराडकर मंत्रमुग्ध 

प्रतिनिधी/ कराड

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 100 व्या जयंतीदिनी संस्कृती मंचने अभंग व भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने गीतसूमनांजली वाहिली. या मैफलीने कराडकर मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाची सुरूवात प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, देवराजदादा पाटील, मानसिंगराव जगदाळे, ऍड. मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण व मुकुंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

प्रारंभी सौ. सायली तळवलकर (मुंबई) यांनी ‘तुज मागतो मी आता’ हे गणेश वंदन सादर केले. त्यांच्या गायनाने सर्व वातावरण भक्तीमय होऊन गेले. जन्मशताब्दी  वर्षात पी. डी. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाच्या केल्या जाणाऱया स्मरणाला ‘ज्योतीने तेजाची आरती’ या सार्थ उपमेला सर्वांनी दाद दिली. हिच भावना व्यक्त करणारे ‘कुशल रामायण गाती’ हे अभिजीत आपस्तंभ (नांदेड) यांनी गायलेले गीतही रसिकांना खूप भावले.

         सौ. तळवलकर यांनी ‘अमृताहुनी गोड’ व ‘गोविंद गोविंद’ हे अभंग सादर केले. त्यांची शास्त्राrय संगीताची बैठक त्यांनी केलेल्या अभंगाच्या विस्तारातून ठळकपणे व्यक्त झाली. अभिजित यांनी ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ व ‘कानडा राजा पंढरीचा’ या लोकप्रिय अभंगाच्या केलेल्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

         पंडित भीमसेन व लतादिदी या दोन भारतरत्न कलाकारांनी गायलेले ‘बाजे रे मुरलिया’ हे गीत सायलीजींनी तितक्याच ताकदीने पेश केले. ‘सावळा नंदाचा मूल’ ही गवळण रसिकांना थेट गोकुळात होऊन गेली. अभिजीतनी यानंतर सादर केलेल्या ‘माझे माहेर पंढरी’ व ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या दोन अभंगानी सभागृहात भक्तीरसाची उधळण केली. सर्व वातावरण विठ्ठलमय होऊन गेले.

         सायलीजींनी  गायलेल्या ‘बोलावा विठ्ठल’ या अभंगाने  कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. कार्यक्रमाचा शेवट अभिजित यांनी ‘कैवल्याच्या चांदण्याला’ या भैरवीने केला. हनुमंत फडतरे यांचा तबला व ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या पखवाजने कार्यक्रमात रंगत आणली. उमेश पुरोहित यांनी संवादिनीवर तर आदित्य सुतार यांनी बासरीवर साथ केली. शिवाजी डाके यांचे टाळ व हेमंत पोटफोडे यांचा चिपळय़ा, शंख व घंटावादनाने मंदिराची वातावरणनिर्मिती केली.

         प्रारंभी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे  स्वागत करण्यात आले. डॉ. हेमंत ताम्हणकर यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. विश्वास ताम्हणकर यांनी सूत्रसंचालन केले.

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कृती मंचचे डॉ. हेमंत ताम्हनकर, राजेंद्र मोहिते, प्रा. सतीश घाटगे, प्रतिष्ठानचे संयोजक संभाजीराव पाटील, अबुबकर सुतार, अंकूश पाटील व बाळू लोहार यांनी परिश्रम घेतले.