|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव!

राजाला पुन्हा जन्टलमन बनविण्यासाठी एकवटले गाव! 

प्रसाद सु. प्रभू  / बेळगाव

राजा हा चंदगड तालुक्मयातील तुर्केवाडी ग्रामस्थांचा लाडका आहे. जन्मताच अपंग आणि गतीमंद आहे, म्हणून त्याच्या जवळच्यांनी त्याला टाकले. मात्र तुर्केवाडीवासियांनी त्याला आपलेसे केले. या गावातील प्रत्येकासाठीच हा राजा जन्टलमन आहे. भरधाव बुलेटच्या धडकेत सध्या त्याचा पाय तुटला आहे. यामुळे प्रचंड वेदना होत असताना आपल्याला काय झाले हे नेमके समजू न शकणाऱया राजासाठी संपूर्ण गावच एकवटले आहे. योग्य शस्त्रक्रिया करून पुन्हा आपल्या पायावर उभे करीत त्याला जन्टलमन बनविण्याची धडपड ग्रामस्थांनी सुरू केली असून बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने त्यांची मदत सुरू केली आहे.

पाच दिवसांपूर्वी तुर्केवाडी येथे एका भरधाव बुलेटची धडक राजाला बसली. त्याच्या वेदना पाहून साऱया ग्रामस्थांनाही वेदना झाल्या. त्याचे कोणीच नसल्याने गावकऱयांनीच एका वाहनात घालून त्याला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याचा डावा पाय तुटल्याचे निदर्शनास आले. तात्पुरते प्लास्टर घालून इतर उपचारानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर आपल्याच घरच्या सदस्याप्रमाणे राजाचा सांभाळ सर्वजण करीत आहेत.

बारा वर्षांपूर्वी रामघाट रोडवरील चंदगड बसस्थानकानजीकच्या एका झाडाखाली राजा सापडला होता. अवघ्या एक ते दीड वर्षांचा तो होता. डोक्मयावरचे केस वाढलेले, हात पाय जन्मताच वाकडे असलेले आणि बुद्धीही थोडी कमीच. यामुळेच जन्मदात्यांनी त्याला अव्हेरले होते. काहीकाळ वृत्तपत्रात बातम्या देवून वाट पाहण्यात आली. मात्र त्याचे नातेवाईक आले नाहीत. मिनी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱया तुर्केवाडीच्याच मैनोद्दीन मुल्ला यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यांनी त्याला घरी नेले. तो मोठा होत गेला. रात्री वास्तव्याला मुल्ला यांच्या घरी असला तरी दिवसभर संपूर्ण गावात त्याचा संचार असतो. यामुळे साऱयांच्याच मनात त्याच्यासाठी आपलेपणाची भावना आहे.

शहाण्या माणसापेक्षाही त्याचे मन चांगले

शारीरिक व्यंग आणि बुद्धी मंद असली तरी त्याचे मन वाईट नाही. आपल्या पोटाला हवे तितकेच तो जेवतो. कोणीही काहीही दिले तर आवश्यकता असेल तितकेच घेतो. रमजानच्या महिन्यात आणि इतर दिवशीही गावातील मशिदीत तो प्रार्थना करतो. पारायण, सप्ताह व धार्मिक कार्यक्रमात डोक्मयावर टोपी आणि गळय़ात टाळ अडकवून वारकऱयांच्या मेळय़ातही असतो. यामुळे राजा सर्वधर्मिय आहे. आणि सर्व धर्मियांचा लाडका आहे. काही ठराविक मंडळी त्याला आर्थिक मदत करतात. मात्र पोटापाण्याची सोय होत असल्यामुळे पैशाचा मोह नसलेला राजा ती रक्कम गावात उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या पेटीत टाकतो. यामुळे शहाण्या माणसापेक्षाही त्याचे मन चांगले आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तमरित्या देखभाल

सध्या त्याच्या मदतीसाठी नजीर शेख या व्यक्तीने सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ठाण मांडले आहे. अबुल शेख, गोपाळ ओऊळकर, इक्बाल शेख, तानाजी चौगुले, आदम मुल्ला, मैनोद्दीन मुल्ला आदींच्या वाऱया सुरू आहेत. ग्राम पंचायत सदस्य बाबू हाजगुळकर आणि माजी सरपंच बाळू चौगुले आदींनी स्थानिक मदतीची धुरा उचलली आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. संतोष, डॉ. वालीकर यांनी तसेच इतर परिचारिका आणि ब्रदर्सनी त्याची देखभाल उत्तमरित्या सुरू केली आहे. बुधवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याच्या पायात बसवावा लागणारा रॉड येथील कीर्ती सर्जिकलने अतिशय स्वस्त दरात उपलब्ध करून दिला आहे. तुर्केवाडी ग्रामस्थांची या राजाप्रतीची भावना पाहून सामाजिक कार्यकर्ते गणेश रोकडे यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून त्याला गावापर्यंत मोफत सोडण्याची जबाबदारी उचलली आहे. यामुळेच काहीकाळ सिव्हिलमध्ये वास्तव्यास आलेला राजा येथेही अनेकांची मने जिंकू लागला आहे.

Related posts: