|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पेढे, परशुरामचे 42 कोटी कोर्टात जाणार!

पेढे, परशुरामचे 42 कोटी कोर्टात जाणार! 

महामार्ग चौपदरीकरण मोबदला,

चिपळुणात आतापर्यंत दीडशे कोटीचे वाटप

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन झालेल्या खातेदारांना आतापर्यंत दीडशे कोटीच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये पेढे आणि परशुराम गावातील 42 कोटीची मोबदला रक्कम देवस्थानने दिलेल्या पत्रानुसार वितरीत केलेली नाही, ही रक्कम न्यायालयात जमा केली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सौ. कल्पना जगताप-भोसले यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हय़ातील कशेडी ते सिंधुदुर्गतील झारापपर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणातील परशुराम ते खेरशेत या दरम्यानच्या चिपळूण तालुक्यातील टप्प्यात परशुराम, पेढे, वालोपे, कळबस्ते, कापसाळ, कामथे, कामथे खुर्द, कोंडमळा, सावर्डे, कासारवाडी, आगवे, असुर्डे आणि खेरशेत या तेरा गावांतील चौपदरीकरणात जाणाऱया जमीन मालकांसाठी 348 कोटी मोबदल्याची आवश्यकता आहे. त्याबदल्यात 268 कोटी प्राप्त झाले असून अजूनही 77 कोटीची आवश्यकता असल्याने तशी मागणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली आहे. पावसाळय़ानंतर 1 ऑक्टोबरला कोणत्याही परिस्थितीत चौपदरीकरणाचे काम सुरू केले जाणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने मोबदला वाटप करताना शेवटच्या क्षणापर्यंत आलेल्या तक्रारींची दखल घेत त्याचे निवारण करण्यावर भर दिला आहे. तक्रारी मार्गी लागेपर्यंत व कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी काहींचे मोबदला वाटप रोखले आहे. त्यासाठी वेळोवेळी या तक्रारींची सुनावणी घेऊन तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, आतापर्यत तालुक्यात दीडशे कोटीची मोबदला रक्कम बाधिताना वाटप करण्यात आलेली असून यामध्ये पेढे आणि परशुराम येथे असलेल्या देवस्थान, कुळ आणि खोत यांच्यातील तिढय़ामुळे आणि देवस्थाननेही मोबदला रक्कम वाटप न करण्याबाबत पत्र दिलेले असल्याने येथील मोबदला वाटप केले जाणार नाही. त्यासंदर्भातील रक्कम ही न्यायालयात जमा करण्यात येईल. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी जगताप-भोसले यांनी सांगितले.

Related posts: