|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भरदिवसा 12 लाखांची बँक लूट

भरदिवसा 12 लाखांची बँक लूट 

प्रतिनिधी /बेळगाव :

बँक अधिकाऱयांच्या डोळय़ात धूळफेक करून पाच ते सहा जणांच्या एका टोळीने भरदिवसा कॅश काऊंटरमधील 12 लाख रुपये चोरल्याची घटना गुरुवारी घडली. सकाळी 10.32 वाजण्याच्या सुमारास किर्लोस्कर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ही घटना घडली असून दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार बँक कर्मचाऱयांच्या लक्षात आला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास बँकेचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर लगेचच 5 ते 6 जण बँकेत शिरले. कर्मचारी आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. ग्राहकांची वर्दळही सुरू झाली होती. प्रवेशद्वारावर सशस्त्र रखवालदारही उभा होता. अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या डोळय़ात धूळफेक करून एक भामटा कॅश काऊंटरमध्ये शिरला. आपल्या हातातील पिशवीत त्याने 12 लाख रुपये भरून घेतले. त्यानंतर सर्वजण तेथून बाहेर पडले.

दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एका ग्राहकाने पैसे काढण्यासाठी स्लिप भरून दिली. त्या ग्राहकाला पैसे देण्यासाठी कॅशिअर संतोष रेडकर यांनी कॅश ट्रेमध्ये हात घातला. त्यावेळी तेथे ठेवलेले पैसे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने व्यवस्थापकांना ही गोष्ट सांगितली. अधिकाऱयांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले त्यावेळी त्यांना धक्का बसला. तातडीने खडेबाजार पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, अमरनाथ रेड्डी, खडेबाजारचे एसीपी जयकुमार, पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱयांनीही प्रथम सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले त्यावेळी पाच ते सहा जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने शहरातील बसस्थानके, रेल्वे स्थानक, व लॉजवर तपासणी करण्यात आली. मात्र ही घटना उघडकीस येण्याआधी गुन्हेगार बेळगाव बाहेर पडले होते.

Related posts: