|Saturday, April 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार विठूमाऊली

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार विठूमाऊली 

अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत.

भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाला माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल जनसामान्यांचा देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे, त्याची अर्धांगिनी त्याच्या बाजूला, पण त्याच्या सोबत नाही, कारण रखुमाई रुसली आहे. या मागची गोष्ट विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी लवकरच विठूमाऊली या मालिकेच्या रूपाने स्टार प्रवाहवर येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळय़ा विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. आजवर पंढरीची वारी आणि इतर अनेक चित्रपटातून संतांना दिसलेलं विठ्ठलाचं रूप, विठ्ठलाची महती, विठ्ठलाचं प्रेम अशा कथा दाखवण्यात आल्या. मात्र, संतांच्या आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावणाऱया साक्षात विठ्ठलालाही नियतीचा फेरा चुकला नाही. विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्यात नेमकं काय घडलं, प्रेमात मत्सराचं किल्मिष कुठून आलं, रखुमाई विठ्ठलावर रुसून बाजूला का उभी राहिली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मालिकेत मिळणार आहेत. मालिकेतले कलाकार आणि इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. जय मल्हार, गणपती बाप्पा मोरयासारख्या पौराणिक मालिकांची निर्मिती केल्यानंतर महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे याच धाटणीची ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.

संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचं माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. त्यासाठी विठूमाऊली मालिकेबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related posts: