|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » क्रिडा » जीवदाने महागडी ठरली : दिनेश कार्तिक

जीवदाने महागडी ठरली : दिनेश कार्तिक 

वृत्तसंस्था/ किंग्स्टन

मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे झेल सोडल्यानंतर आपल्या संघाला यजमान विंडीजविरुद्ध एकमेव टी-20 सामन्यात नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला, असे प्रतिपादन भारतातर्फे डावात सर्वाधिक धावा जमवणाऱया दिनेश कार्तिकने केले. शतकवीर इव्हिन लुईसने धुवांधार फटकेबाजी केली. मात्र, त्यापूर्वी त्याला दोन जीवदाने लाभली. या पार्श्वभूमीवर कार्तिक पत्रकार परिषदेत बोलत होता. या निकालानेच भारताच्या विंडीज दौऱयाची सांगताही झाली.

विंडीजच्या डावातील 6 व्या षटकात मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरच्या एका चेंडूवर लुईसचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सपशेल चुकला होता. मात्र कर्णधार विराट कोहली व मोहम्मद शमी यांच्यात समन्वयाचा अभाव नसल्याने त्यावेळी हा झेल सोडला गेला होता. पुढे, चारच चेंडूंच्या अंतराने लुईसला आणखी एक जीवदान लाभले. यावेळी कुलदीप यादवच्या चेंडूवर लाँगऑफवरील दिनेश कार्तिकनेच झेल सांडला होता.

‘फलंदाजाचा एखादा फटका चुकला आणि त्यावेळी षटकार गेला तर हा दिवस त्या फलंदाजाचा असे समजण्यात काहीच गैर नाही. अशावेळी आपल्या हाती काहीच उरत नाही. पण, जेव्हा झेल सोडले जातात, त्यावेळी त्याची मोठी किंमत मोजावीच लागते. आम्हाला असे झेल सोडल्यानेच नामुष्कीजनक अपयशाचा सामना करावा लागला आहे’, असे कार्तिकने नमूद केले.

आपण झेल सोडला, त्यावेळी नेमकी स्थिती काय होती, याचा उल्लेख करताना तो म्हणाला, ‘उंच झेल टिपण्यात मी फारशा चुका करत नाही. पण, मी अंदाज घेत असताना विराट आपल्या दिशेने येत असल्याचे मला जाणवले. शिवाय, त्याला आपला धक्का बसू नये, हा माझा होरा होता. त्या पार्श्वभूमीवर, सेकंदभर मी पुढे सरकणे टाळले. यानंतर अपेक्षित पोझिशनला येऊन झेल पूर्ण करणे निव्वळ अशक्य होते’.

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकात 6 बाद 190 अशी उत्तम धावसंख्या उभारली होती. पण, प्रत्यक्षात विंडीजतर्फे इव्हिन लुईसने अवघ्या 62 चेंडूतच नाबाद 125 धावांची आतषबाजी करत यजमान संघाला 18.3 षटकातच विजय संपादन करुन दिला. 190 ही उत्तम धावसंख्या होती. पण, लुईसला लगाम घालता न आल्याने आपल्या पदरी अपयश आले, असे भारतीय संघातर्फे 29 चेंडूत सर्वाधिक 48 धावा जमवणाऱया कार्तिकने पुढे नमूद केले.

‘इव्हिन लुईसने जितके चौकार ठोकले, त्यापेक्षा दुपटीने अधिक षटकार ठोकले. काही चांगल्या चेंडूंवर देखील त्याने फटकेबाजी केली. त्यामुळे, त्याला गोलंदाजी करणे प्रत्येक गोलंदाजासाठी कठीण ठरले’, असे तो एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. तामिळनाडूचा हा 32 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज सध्या भारताच्या नियमित संघात नाही. तरी आपल्याला ज्यावेळी संधी मिळते, त्यावेळी पूर्ण आक्रमक फलंदाजी साकारण्याचा आपला प्रयत्न असतो, असे त्याने स्पष्ट केले. अष्टपैलू हार्दिक पंडय़ा सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने या एकमेव टी-20 सामन्यात खेळू शकला नाही. त्याची उणीव प्रकर्षाने जाणवल्याचे कार्तिकने सांगितले.

‘हार्दिक पंडय़ासारखे मातब्बर खेळाडू ज्यावेळी संघात नसतात, त्यावेळी प्रकर्षाने त्यांची उणीव जाणवते. पंडय़ाला विकेट घेण्याची कला अवगत आहे. शिवाय, मोठे, उत्तूंग फटके लगावण्याची त्याची क्षमताही निर्विवाद आहे. पण, काही वेळा किरकोळ दुखापती झाल्यास पर्याय देखील नसतो. त्या आपल्या सर्वांच्या नियंत्रणाबाहेरील बाबी असतात’, असे दिनेश कार्तिकने शेवटी नमूद केले.

Related posts: