|Monday, October 22, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भावनात्मक आधार… वृद्धत्वातली गरज…!

भावनात्मक आधार… वृद्धत्वातली गरज…! 

बसमधून प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक आजोबा येऊन बसले. वय साधारण पंचाहत्तरीच्या आसपास, उंचंपुरं व्यक्तिमत्त्व, चेहऱयावर जन्मजात हुशारीचं तेज…  काय गं, कुठची तू, काय करतेस वगैरे सारं जाणून घेत त्यांनी घडाघडा बोलायला सुरुवातच केली. कित्येक दिवसात कुणाजवळ बोलायलाच मिळालं नसावं अशा तऱहेने ते सलग दीड तास सुसंबद्ध बोलत होते. नोकरी करत असतानाचे अनुभव, कॉम्प्युटर युग, बदलती जीवनशैली या साऱयावर बोलता बोलता ते अचानक थांबले आणि म्हणाले, सॉरी, तुला खूप बोअर केलं गं मी. त्यावर मी नाही हो… असं म्हणून हसले. त्यानंतरचं त्यांचं बोलणं सुन्न करणारं आणि विचार करायला लावणारं होतं.

मी निवृत्त मुख्याध्यापक. मला दोन मुलगे आहेत. सुना आहेत. सारे  उच्चशिक्षित. नोकऱयाही छान आहेत. तीन नातवंडे आहेत. मला आणि माझ्या पत्नीला पेन्शन आहे. आर्थिक सुबत्ता, नोकर-चाकर, खाणं-पिणं याची कसलीही कमतरता नाही. पण दु:ख हे आहे की घरातल्या कुणालाच आमच्यासाठी पाच मिनिटंही वेळ नाही. कामाव्यतिरिक्त आमच्याजवळ कुणाचा संवाद नाही. सुना-मुलं नोकरीमध्ये बिझी, नातवंडे  शाळा, क्लास यामध्ये बिझी, उरलेला वेळ मोबाईल, कॉम्प्युटर यामध्ये… आम्ही समजू शकतो की गतिमान जीवनशैली, वर्कलोड, स्ट्रेस सारं-सारं कळतं बघ आम्हाला, परंतु दिवसातून चार वाक्मयं आस्थेनं चौकशी करणारं कोण भेटलं तर आनंद वाटतो गं. सारं यंत्रवत् झालंय… काही वेळा  आम्ही ‘अडगळ’ आहोत की काय असा विचारही मनात येतो. मुलं म्हणतात, ‘आहेत ना नोकर-चाकर, रहायचं निवांत…’ सारं ठीक, पण मायेच्या शब्दांचं काय गं? अधेमधे बसने प्रवास करतो… कुणीतरी भेटतं, मनमोकळं बोलतो… काही दिवस छान जातात मग! असो, ओळख नसतानाही भरभरून बोललो पोरी, काही चुकलं असेल तर माफ कर… असं म्हणत पाणावलेल्या डोळय़ांनी स्टॉप आल्यावर आजोबा उतरून निघूनही गेले…

सारी भौतिक सुखे आहेत परंतु आपुलकीनं संवाद साधायला कुणीच नाही किंवा घरातली माणसे वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे म्हातारपणी येणारं ‘मानसिक एकाकीपण’ ही वरील उदाहरणातील आजोबांप्रमाणे अनेक वडील पिढीतील बुजुर्गांची समस्या बनत चालली आहे. साठीनंतर थोडासा निवांतपणा असतो परंतु इतर सारी समृद्धी असली तरी अनेकांचं शरीर वय वाढत चालल्याची जाणीव करून देऊ लागतं.

तेल न घातलेल्या बिजागरांसारखे सांधे कुरकुरायला लागतात. दंतपक्ती मोकळय़ा होऊ लागतात. शरीर थकू लागतं. इतर काही आजार असतील तर गोळय़ांच्या भडिमाराने कंटाळा आलेला असतो. थोडक्मयात ‘आपल्याच गावी आपण यावं आणि ते गावच अनोळखी वाटावं’ अशी सारी अवस्था असते. या साऱया स्थित्यंतराच्या काळामध्ये घरातल्यांकडून आस्थेनं विचारपूस व्हावी, ही अपेक्षा, गरज निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक असतं.

अर्थात याला अनेक बाजूही आहेत. सगळीच तरुण मंडळी सरसकट वडील पिढीकडे दुर्लक्ष करते अशातला भाग नाही परंतु या समस्येमध्ये मोठय़ा प्रमाणात होणारी वाढ निश्चितच नजरेआड करता येत नाही. जीवनशैलीमध्ये झपाटय़ाने होणारे बदल, नोकरी व्यवसायातील ताणतणाव, सतत अपडेट राहण्याची गरज यामुळे अनेकदा तरुण पिढीला वेळ काढणंही मुश्कील होऊन बसतं. शनिवार-रविवार मिळालाच तर स्वतःचे छंद, स्पेस, मित्र-मैत्रिणी असा रिलॅक्स होण्यामध्ये जातो. हे सारं पहात असताना एकंदरच मुलांच्या जीवनाच्या बदललेल्या प्रायोरिटीज, धावपळ हे आई-वडिलांना कळत असतं. परंतु दिवसातली पाच मिनिटं आपल्यासाठी दिली जावी, चौकशी व्हावी, कधीतरी एखाद्या निर्णयाच्याबाबतीत आपलंही मत विचारावं असं वाटत असतं. परंतु समोरून तसा प्रतिसाद आला नाही की खरंच आता आपण इतके निरुपयोगी आहोत का? आपण ‘अडगळ’ तर बनत चाललो नाही ना? असे अनेक प्रश्न मनात येऊ लागतात आणि येणाऱया शारीरिक दौर्बल्याच्या भीतीसोबत मग मानसिक अस्वास्थ्यही जाणवू लागतं. या बाबतीत वडील पिढीनंही एक गोष्ट प्रयत्नपूर्वक लक्षात घ्यायला हवी की, बदल होणं हा जगातल्या प्रत्येक गोष्टीचा स्थायिभाव आहे. कधी तो धीम्या गतीनं होतो तर कधी जलद… आपली मानसिक तयारी नसली की बदलाचं अवघडपण मनात घर करू लागतं. अनेकदा आपण विरोध केला तरी बदल अटळ असतो. त्यामुळे स्वतःला मानसिक त्रास करून न घेता त्यातही काय चांगलं आहे हे पाहणं अनेकदा हितावह ठरतं. जशा वडील पिढीनं काही गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे तसंच तरुण पिढीनेही काही गोष्टीचं कटाक्षाने भान ठेवणं आवश्यक आहे.

‘आहेत नोकर चाकर, रहावं की निवांत’ असं म्हणणं जरी सोपं असलं तरी मानवाला ‘मानसिक आधाराची’ असलेली मूलभूत गरज ही उतारवयात जास्त जाणवू लागते. उत्तम नोकरी लागून सारं काही सेटल झाल्यावर काहीसं एकसुरी, सुरळीत असं आपलं आयुष्य चाललेलं असतं. आणि म्हणूनच असेल कदाचित हे सारं ज्या माता-पित्यांमुळे प्राप्त झालं त्याची जाणीव म्हणावी तशी रहात नाही. तरुणपणी काही गोष्टींमधले सुख आपण इतके गृहित धरून चालतो की, आपल्याला कृतज्ञ वाटलं पाहिजे हेच जणू विसरतो. कुठल्याही क्षणी असण्याचं नसणं होऊ शकतं याचा विसर पडतो आणि आपल्याच जन्मदात्यांना वेळ देणं, आपुलकीनं चौकशी करणं यासाठीही सबबी सांगितल्या जातात.

घरातल्या माणसांजवळ संवाद असणं हे घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी, मनःशांतीसाठीही फार आवश्यक आहे. कुठलंही नातं तणावपूर्ण होऊ न देता जपणं महत्त्वाचं आहे. अनेकदा वृद्धत्वाकडे वाटचाल करत असलेल्या मंडळींना मुले-मुली, सुना, नातवंडे यांच्याकडून आपुलकीने होणारी विचारपूस आणि ‘आम्ही आहोत हां!’ एवढं मायेचं वाक्मयही जगण्याचं बळ देऊन जातं, उमेद देतं हे भानही घरातल्या मंडळींनी ठेवणं आवश्यक आहे. जगामध्ये कुणीही अमरत्वाचा वर घेऊन आलेलं नाही. जोवर आपले माता-पिता आहेत तोवर त्यांची आस्थेनं चौकशी, त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता चोवीस तासातील दहा मिनिटे तरी काढणं नक्कीच अशक्मय नाही. ज्या सावलीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो त्या सावलीची किंमत अमोल असते याचं भान राखलं जायला हवं. ध्त्d agा हे् sद त्ग्ttत, ंल्t हे् tप्at त्ग्ttत sद स्ल्म्प्!  हे लक्षात ठेवून त्यादृष्टीनं वाटचाल केली तर ज्ये÷ांसाठी, वडील पिढीसाठी ते निश्चितच सुखावह आणि समाधान देणारं ठरेल हे मात्र खरं!

Related posts: