|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हितरक्षण समितीच्या त्रैमासिक सभेत गोंधळ

हितरक्षण समितीच्या त्रैमासिक सभेत गोंधळ 

प्रतिनिधी/ चिकोडी

अनुसूचित जाती-जमातीच्या हितरक्षण समितीची मंगळवार 11 रोजी त्रैमासिक सभा तालुका पंचायतीच्या सभाभवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेला लोकप्रतिनिधींची हजेरी व गैरहजेरी या कारणावरुन दोन गटात वादाला सुरुवात झाली. सदर वाद वाढतच गेल्याने सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद आटोक्यात आला. 

मंगळवारी सकाळी 11 वाजता सभेला प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित अनुसूचित जाती-जमातीच्या प्रमुखांच्या एका गटाने या बैठकीस नेहमी चिकोडी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी का गैरहजर असतात. याविषयी आवाज उठविताच दुसऱया एका गटाने या बैठकीस लोकप्रतिनिधींची आवश्यकताच काय असा प्रश्न उपस्थित केला.

या बैठकीस अधिकाऱयांसमवेत आपल्या समस्याविषयी चर्चा करण्यात येते, असे सांगताच या दोन्हीही गटात शाब्दीक चकमक उडाली. तहसीलदार सी. एस. कुलकर्णी यांनी, या सभेत समस्याविषयी चर्चा व्हावयास हवी, असे सांगितले. पण या दोन्ही गटातील संघर्ष कमी न झाल्याने शेवटी सीपीआय मल्लनगौडा रायकर यांनी दोन्ही गटातील प्रमुखांची समजूत काढली. त्यानंतर सभेस प्रारंभ झाला. पण सभेमध्ये उपस्थित समाज प्रमुखांनी सार्वजनिक समस्याऐवजी वैयक्तिक समस्याविषयीच आवाज उठविल्याने तसेच समस्या विचारताना उपस्थित प्रत्येकाने स्वतःचीच प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केल्याने अधिकाऱयांनाही उत्तरे देण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या.

 काही दलित नेत्यांनी सरकार दलितासाठी अनेक योजना राबवत आहे. पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व खात्यांच्या अधिकाऱयांना अनुसूचित जाती-जमातीच्या वर्गासाठी सर्व सुविधा देण्याची सूचना केली. यावेळी सीपीआय नायकर, समाज कल्याण अधिकारी एस. एस. बडिगेर, तालुका पंचायतीचे विरण्णा वाली, तालुका वैद्याधिकारी विठ्ठल शिंदे, चिकोडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जगदीश हुलगेज्जी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

उपस्थितांतील ढवळाढवळीचा परिणाम

नेहमी या सभेत समस्यांच्या निवारणासाठी चर्चा होण्याऐवजी गोंधळच निर्माण होत असल्याने तसेच उपस्थितांमधून समस्या मांडताना होणाऱया ढवळाढवळीमुळे सदर त्रैमासिक सभा गोंधळमय असल्याची चर्चा उपस्थित अधिकारीवर्गातून होत होती.

काटेकोर नियोजन करण्याची गरज

सदर सभेसाठी तालुक्यातील अनेक दलित समाज प्रमुख उपस्थित राहतात. पण या सभेस उपस्थित राहून सामाजिक समस्या मांडून इच्छिणाऱयांना पुरेपूर बैठक व्यवस्थाही नसते. त्यामुळे अनेकांना उभेच रहावे लागते. सभेचे गांभीर्य ओळखून घेऊन नियोजनबद्ध बैठक व चर्चा घेणे गरजेचे आहे.

Related posts: