|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिरवली-येलोंदेवाडी प्रकल्पग्रस्तांना मिळणार चौपट मोबदला

शिरवली-येलोंदेवाडी प्रकल्पग्रस्तांना मिळणार चौपट मोबदला 

भास्कर जाधव यांची माहिती,

मंत्रालयातील बैठकीत 8 कोटी मंजूर,

गडनदी प्रकल्पासाठीही 25 कोटी मंजुरीचे आश्वासन

प्रतिनिधी /चिपळूण

गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या तालुक्यातील शिरवली-येलोंदेवाडी धरण प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाच्या चार ते पाचपट जमिनीचा मोबदला मिळणार आहे. आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने प्रकल्पग्रस्तांच्या मागणी पाठपुरावा केला होता. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील रखडलेल्या गडनदी प्रकल्पासाठीही 25 कोटींच्या निधीला मंजुरी देण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले आहे.

गुहागर मतदार संघात येणाऱया चिपळूण तालुक्यातील शिरवली-येलोंदेवाडी धरण प्रकल्प आणि संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथील गडनदी प्रकल्प या रखडलेल्या दोन्ही प्रकल्पांना चालना मिळण्यासाठी आमदार जाधव गेले वर्षभर पाठपुरावा करीत होते. विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावर या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याबाबत लवकरच बैठक बोलावून मार्ग काढला जाईल आणि या बैठकीला आ. जाधव यांना बोलावण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेमध्ये राज्यमंत्री ना. शिवतारे यांनी दिले होते. त्यानुसार झालेल्या या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सन 2011मध्ये सुरू झालेल्या येलोंदेवाडी धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांच्या विविध शंकांचे निरसन न झाल्यामुळे होत असलेल्या विरोधामुळे रखडले होते. त्यानंतर पालकमंत्री असताना जाधव यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधत शंकांचे निरसन केल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू झाले होते, परंतु 2013नंतर शासनाकडून निधी न आल्याने हे काम रखडले आहे. या प्रकल्पाचा फायदा परिसरातील 20 ते 25 गावांना होणार असल्यामुळे तो लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला सुधारित भावाने दर द्यावा अशी मागणी जाधव यांनी या बैठकीत केली. यावेळी उपस्थित अधिकाऱयांनी भूसंपादनासाठी सुमारे 42 कोटींची आवश्यकता असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर शिवतारे यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी तात्काळ 8 कोटी रूपये देण्याचे मान्य केले आणि उर्वरित रक्कम येत्या 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

गडनदी प्रकल्प दिड वर्षात पुर्ण होणार

गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यासह अनेक प्रश्नही यावेळी उपस्थित केले. त्यावर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी 25 कोटी रूपये इतक्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येईल व हा प्रकल्प येत्या दीड वर्षात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येणार येईल, असे आश्वासन शिवतारे यांनी जाधव यांना दिले. त्याचबरोबर धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या जमिनी कसण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडे उपसा सिंचन योजना करून देण्याची मागणी केली होती. त्यासाठी शासनाने जमिनीच्या किंमतीच्या 65 टक्के रक्कम भरण्याच्या अटीवर करून देण्याचे मान्य केले होते, परंतु, ही अट शिथील करून सदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे शासनाच्या खर्चाने करावी, असा आग्रह जाधव यांनी धरल्यानंतर शिवतारे यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली.

या बैठकीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के. एच. अन्सारी, उपसचिव धरणे, अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.