|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बस दरीत कोसळल्याने16 भाविकांचा मृत्यू

बस दरीत कोसळल्याने16 भाविकांचा मृत्यू 

वृत्तसंस्था /श्रीनगर

गेल्या आठवडय़ातील दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेवर अपघाताचे संकट कोसळले आहे. रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने 16 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी आहेत.

अमरनाथहून श्रीनगरला येत असलेल्या या नोंदणीकृत बसला जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हय़ात नचिलाना येथील सैनिक छावणीनजीक अपघात झाला. बसचे मागचे टायर अचानक फुटल्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. मृत्यू ओढविलेल्या 16 भाविकांमध्ये 14 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. 26 प्रवासी जखमी आहेत. त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत. या बसमध्ये एकूण किमान 46 प्रवासी असावेत असा अंदाज आहे. गंभीर प्रवाशांना उपचारांसाठी श्रीनगर येथे नेण्यात आले आहे. छावणीजवळच घडल्याने सैनिक आणि पोलिसांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. त्यामुळे काही प्रवाशांचे प्राण वाचू शकले.

 स्थानिकांनीही या कार्यात मोलाचे साहाय्य केले. बसचे पत्रे कापून अनेक प्रवाशांची सुटका करण्यात आली. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवरील उपचारांसाठी शक्य ते सर्व साहाय्य करण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही दुःख व्यक्त केले.